रस्त्यावर फरफटत गेली, नाक फोडून घेतलं, पण हातातला iPhone सोडला नाही; धक्कादायक घटना
राजधानी दिल्लीत एका शिक्षिकेला मोबाईल चोरण्याच्या प्रयत्नात रस्त्यावरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षिका रिक्षात बसलेली असताना बाईकस्वार चोरांनी तिचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत महिला गंभीर जखमी झाली असून, रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.
राजधानी दिल्लीत मोबाईल चोरण्याच्या प्रयत्नात चोरांनी एका शिक्षिकेला रस्त्यावरुन फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिक्षिका रिक्षात बसलेली असताना बाईकस्वार चोरांनी तिच्या हातातील आयफोन चोरण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान शिक्षिका रिक्षातून खाली पडली असता चोरांनी तिला फरफटत नेलं. यामुळे महिलेला गंभीर जखमा झाल्या आहेत. तिचं नाकही फुटलं आहे. पीडित शिक्षिकेला दक्षिण दिल्लीच्या साकेत येथील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. योविका चौधरी असं या शिक्षिकेचं नाव असून, त्या शाळेतून आपल्या घरी निघाल्या होत्या. याचवेळी चोरांनी त्यांचा आयफोन चोरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
योविका यांचं नाक फ्रॅक्चर
शुक्रवारी ही घटना घडली आहे. देवली येथे राहणाऱ्या योविका चौधरी शाळेतून आपल्या घराच्या दिशेने निघाल्या होत्या. याचवेळी दुचाकीवरील दोन तरुणांनी रिक्षात बसलेल्या योविका यांच्या हातातील आयफोन खेचण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत योविका खाली पडल्या आणि काही अंतरपर्यंत फरफटत गेल्या. या झटापटीत चोर मोबाईल घेऊन पळून गेले. दरम्यान, योविका यांचं नाक फ्रॅक्चर झालं असून, अनेक ठिकाणी जखमा झाल्या आहेत. योविका चौधरी ज्ञानभारती शाळेत शिक्षिका आहेत.
युविका चौधरी यांना तात्काळ मॅक्स साकेत हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांच्या नाकावर आणि इतर जखमांवर उपचार करण्यात आले. सध्या त्या रुग्णालयातच आहेत.
योविका चौधरी यांनी उलगडला संपूर्ण घटनाक्रम
पीडिता योविका चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पीव्हीआर साकेत येथून रिक्षा पकडली आणि आपल्या घराच्या दिशेने निघाल्या होत्या. याचरदरम्यान खोका मार्केटजवळ स्प्लेंडरवरुन दोन तरुण पाठलाग करत आले आणि त्यांच्या हातातील आयफोन 13 चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी आयफोन वाचवण्याच्या प्रयत्नात मी रिक्षातून खाली पडले आणि फरफटत गेले. रस्त्यावरुन फरफटत गेल्याने मला गंभीर जखमा झाल्या आहेत.
साकेत पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी प्रकरणाचं गांभीर्य ओळखत तातडीने तपास सुरु केला आहे. तसंच चोरांची ओळख पटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण अद्याप याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.