राजस्थानच्या अजमेरमध्ये पोलिसांनी 19 वर्षाच्या तरुणाला अटक केली आहे. तरुणावर तब्बल 200 लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. बनावट गुंतवणूक योजनेच्या नावाखाली तरुणाने 200 लोकांना आपल्या जाळ्यात ओढलं आणि 42 लाखांचा गंडा घातला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. काशीफ मिर्झा असं आरोपी तरुणाचं नाव आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काशिफ मिर्झा 11 वीचा विद्यार्थी आहे. त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून पीडितांना आपल्या जाळ्यात ओढलं होतं. तुम्ही जर गुंतवणूक केली तर चांगला नफा कमावू शकाल असं खोटं आश्वासन त्याने दिलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काशिफ मिर्झा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असून त्याचे इंस्टाग्रामवर त्याचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स आहेत. 


आरोपी काशिफने पीडितांना सांगितलं होतं की, जर तुम्ही 99 हजार 999 रुपयांची गुंतवणूक केली तर तुम्हाला 13 आठवड्यात 1 लाख 39 हजार 999 रुपये मिळतील. लोकांना खरं वाटावं यासाठी त्याने काहीजणांना खरोखर नफा मिळवून दिला होता. यानंतर त्याने त्यांच्या माध्यमातून इतरांचा विश्वास जिंकून घेतला आणि त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडलं. 


पोलिसांनी त्याच्याकडून कॅश काऊंटिंग मशून, मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केले आहेत. अटक केल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्याला दोन दिवसांची पोलीस रिमांड सुनावण्यात आली आहे. 


एखाद्या व्यक्तीने गुंतवणूक करण्यापूर्वी कंपनी किंवा व्यक्तीबद्दल नेहमी योग्य माहिती घेतली पाहिजे. फसवणूक करणारे सहसा हमी परतावा देतात आणि त्यांच्या गुंतवणूक धोरणांमध्ये पारदर्शकता नसते. गुंतवणूकदाराने हे देखील तपासले पाहिजे की गुंतवणूक कंपनी आणि गुंतवणूक योजनांचा प्रचार करणाऱ्या व्यक्तींचे संबंधित वित्तीय नियामक प्राधिकरणांकडून योग्यरित्या नियमन केलं आहे की नाही.