धक्कादायक! 5 दिवस कुटुंबियांच्या मृतदेहासोबत राहिली अडीच वर्षांची मुलगी
9 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू आणि कुटुंबातील चार सदस्यांच्या कथित आत्महत्येची धक्कादायक प्रकरणं समोर आलं आहे.
बंगळूरू : बंगळुरूमध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू आणि कुटुंबातील चार सदस्यांच्या कथित आत्महत्येची धक्कादायक प्रकरणं समोर आलं आहे. अजून एक धक्कादायक गोष्ट म्हणजे पाच दिवसांपासून मृतदेहांसह एक अल्पवयीन मुलगी बसून होती. या अल्पवयीन मुलीला पोलिसांनी घरातून बाहेर काढलं आहे.
शुक्रवारी रात्री बयादरहल्ली पोलीस स्टेशन परिसरातील घराच्या आत पाच मृतदेह आढळले, तेथून पोलिसांनी एका अडीच वर्षांच्या मुलीला बाहेर काढले. ही मुलगी पोलिसांना जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत आढळली.
मुलगी राहत असलेल्या घरी तिची आई सिंचना (34), आजी भारती (51), आईची बहीण सिंधुराणी (31), आईचा भाऊ मधुसागर (25) यांचे मृतदेह छतावर लटकलेले होते. ज्या खोलीत मधुसागर फासावर लटकलेल्या अवस्थेत सापडला होता त्याच खोलीत ती मुलगी सापडली. या मुलीला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिला उपचार आणि समुपदेशनाची गरज असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
या प्रकरणाचा तपास करत असलेल्या बयादरहल्ली पोलिसांनी सांगितलं की, मृतदेहांचं शवविच्छेदन करण्यात येईल. जरी हे आत्महत्येचे प्रकरण वाटत असलं तरी शवविच्छेदनात याची पुष्टी केली पाहिजे.
कौटुंबिक कलहामुळे या घरातील सदस्यांनी आपलं जीवन संपवल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कुटुंबीयांचा मृत्यू सुमारे 4 दिवसांपूर्वी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.