काश्मीरमध्ये आता हवाई मार्गानेच प्रवास करणार भारतीय जवान
जवानांच्या सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्याची फार मोठी ठेच लागलेल्या गृहखात्याने आता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व निमलष्करी दलांच्या ताफ्यांची वाहतूक आता हवाई मार्गानेच केली जाणार आहे. सर्व प्रकारच्या श्रेणीतल्या सैनिकांची वाहतूक यापुढे केवळ विमानाने करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत. गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार आता बीएसएफ, असम रायफल्स, सीआरपीएफ, सीआयएसएफ, एसएसबी, एनएसजी आणि आयटीबीपीच्या जवानांना काश्मीर खोऱ्यात तैनात करण्यासाठी पाठवत असताना हवाई मार्गेच श्रीनगरला आणलं जाणार आहे. आजपासूनच हा निर्णय लागू करण्यात आला आहे. पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर सरकारने जवानांच्या सुरक्षेच्या बाबतीत अनेक पाऊलं उचलली आहेत.
काही नियमांमध्ये बदल
1. न थांबता वाहतूक
2. ताफा जात असताना इतर गाड्यांना प्रवेशबंदी
3. सामान्य गाड्या रोखण्याची जबाबदारी पोलिसांकडे.
4. ताफ्यातील गाड्यांवर लाल झेंडे लावण्यात येतील ज्यामुळे कोणीही मध्ये येऊ नये.
5. लाल झेंडा क्रॉस करणाऱ्या गाडीला शत्रू मानलं जाईल.
6. ताफा जात असताना 15-20 मिनिटं इतर गाड्या थांबवण्यात येतील.
7. सेना, पोलीस आणि सीआरपीएफ एकत्र सुरक्षा निश्चित करतील.