Constable stops Police Commissioner: परीक्षा केंद्रांवर मोबाइल नेण्यास परवानगी नसल्याने महिला कॉन्स्टेबलने थेट पोलीस आयुक्तांनाच रोखल्याची एक घटना समोर आली आहे. हैदराबादमध्ये घडलेल्या या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. के कल्पना असं या मिला कॉन्स्टेबलचं नाव असून तिने प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्याने कौतुक होत आहे. महत्त्वाचं म्हणजे, पोलीस आयुक्तांनीही तिला शाबासकी दिली असून बक्षीस म्हणून 500 रुपये दिले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्पना यांना एल बी नगर सरकारी शाळेत तैनात करण्यात आलं आहे. 10 वीची परीक्षा असल्याने केंद्रावर कोणताही गैरप्रकार होऊ नये याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. परीक्षा केंद्रावर मोबाइल नेण्यास परवानगी नसून, त्याचं पालन व्हावं याचीही काळजी त्या घेत आहेत.



यादरम्यान 10 वीची परीक्षा असल्याने सुरक्षाव्यवस्था पाहण्यासाठी रचकोंडाचे पोलीस आयुक्त डी एस चौहान परीक्षा केंद्रांची पाहणी करत होते. बी नगर सरकारी शाळेतही पाहणी करण्यासाठी ते पोहोचले होते. दरम्यान ते शाळेत जात असताना त्यांच्या हातात मोबाइल असल्याचं कल्पना यांनी पाहिलं. यानंतर त्यांनी थेट पोलीस आयुक्तांनाच परीक्षा केंद्रावर मोबाइल नेण्यास परवानगी नसून तो इथे जमा करा असं सांगितलं. 


कल्पना यांनी थेट पोलीस आयुक्तांनाच रोखल्याने तिथे उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी आश्चर्याने पाहू लागले होते. पण पोलीस आयुक्तांनी तिच्याकडे हसून पाहिलं आणि आपला मोबाइल फोन सोपवला. यानंतर ते परीक्षा केंद्रात पाहणी करण्यासाठी गेले. 



बाहेर आल्यानंतर पोलीस आयुक्तांनी कल्पना यांनी आपलं कर्तव्य बजावल्याबद्दल कौतुक केलं. बक्षीस म्हणून त्यांनी तिला 500 रुपयांची नोटही दिली. यावेळी त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना अशाच प्रकारे सतर्क राहत प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य पार पाडा असं सांगितलं. 


तसंच परीक्षा केंद्रात जाणाऱ्या प्रत्येत व्यक्तीची तपासणी करा आणि मोबाइल नेण्यास अजिबात परवानगी देऊ नका असा आदेशही दिला. या घटनेनंतर कल्पना यांचं कौतुक होत आहे.