...अन् पतीचा चेहरा पाहताच गर्भवती पत्नीचा मृत्यू, 20 दिवसांनी होणार होती डिलिव्हरी; डॉक्टरही हळहळले
दोन वर्षांपूर्वी पल्लवीचं गुड्डूशी लग्न झालं होतं. सर्व काही व्यवस्थित सुरु असताना एके दिवशी पतीवर 307 कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आणि कारावासाची शिक्षा झाली. 8 महिन्यांची गर्भवती असणारी पल्लवी पतीला भेटण्यासाठी जेलमध्ये गेली होती. पण तिथे असं काही झालं की तिचा जागीच मृत्यू झाला.
पती आणि पत्नी हे एकमेव असं नातं असतं जे रक्ताचं नसतानाही आयुष्यभर सोबत असतं. आयुष्याच्या शेवटापर्यंत हा जोडीदार आपल्या सुख आणि दु:खात सहभागी असतो. पण जेव्हा हाच जोदीदार काही कारणास्तव आपल्यापासून दूर जातो तेव्हा होणाऱ्या यातनाही तितक्याच असतात. बिहारमध्ये अशाच प्रकारे पतीपासूनचा हा विरह सहन न झाल्याने एका महिलेने मृत्यूला कवटाळ्याचं समोर आलं आहे. पतीचा चेहरा पाहताच महिलेचा मृत्यू झाला. दुर्दैवी बाब म्हणजे, महिला 8 महिन्यांची गर्भवती होती. महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांसह डॉक्टरही हळहळले आहेत.
हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपात जेलमध्ये बंद असलेल्या पतीला भेटायला गेली असता महिला त्याचा चेहरा पाहताच बेशुद्ध पडली. महिलेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केलं. महिला 8 महिन्यांची गर्भवती होती. 27 जूनला तिची डिलिव्हरी होणार होती. महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या दीराने पोलीस प्रशासनाला जबाबदार धरलं आहे. बिहारच्या भागलपूरमधील विशेष केंद्रीय जेलमध्ये ही घटना घडली आहे.
6 जून रोजी विशेष केंद्रीय जेलमध्ये ही घटना घडली आहे. भागलपूरच्या घोघा गोविंदपूर येथील गुड्डू यादवचं घोघा जानिडीहमधील पल्लवी यादवशी 2 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं आणि सध्या पल्लवी 8 महिन्यांची गर्भवती होती. फक्त 20 दिवसांनी तिची डिलिव्हरी होणार होती. पण तिच्यासह तिच्या बाळाचाही मृत्यू झाला आहे.
जेलमध्ये बंद होता गुड्डू
गुड्डू यादवचा जमिनीवरुन विनोद यादवशी वाद झाला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात गेल्या आठ महिन्यापासून तो भागलपूरमधील विशेष केंद्रीय जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.
पतीला भेटायला गेली आणि मृत्यू
6 जून रोजी पल्लवी जेलमध्ये बंद पती गुड्डूला भेटण्यासाठी गेली होती. पण पती समोर येताच पल्लवी बेशुद्ध पडली. यानंतर तिला तात्काळ मायागंज रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तिची तपासणी केल्यानंतर मृत घोषित केलं. पल्लवीच्या मृत्यूसह तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाचाही मृत्यू झाला आहे.
27 जूनला होणार होती डिलिव्हरी
पीडित कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, पल्लवीचा 8 वा महिना सुरु होता. डॉक्टरांनी डिलिव्हरीसाठी 27 जून तारीख दिली होती. पण त्याआधीच ही दुर्दैवी प्रकार घडला.
पोलिसांमुळे वहिनीचा मृत्यू - विक्की यादव
गुड्डूचा भाऊ विक्की यादवने पोलिसांच्या मनमानी कारभारामुळे वहिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. विनोद यादव याने पैसे देऊन माझा भाऊ गुड्डू याला जेलमध्ये पाठवलं. जर भाऊ जेलमध्ये गेला नसता तर ही वेळ आली नसती. आज आमचं संपूर्ण कुटुंबच विखुरलं आहे. यासाठी फक्त पोलीस प्रशासनच जबाबदार आहे असं विक्की यादवने म्हटलं आहे.
पल्लवीच्या मृत्यूनंतर कुटुंबाने शवविच्छेदन करण्यास नकार दिला. यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत मृतदेह कुटुंबाकडे सोपवण्यात आला. पत्नीवरील अंत्यसंस्कारासाठी पती गुड्डूला पोलीस संरक्षणात आणण्यात आलं होतं. यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार पार पडले.