बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये एका सुटकेसमध्ये तीन वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला होता. हा तपास मुलीच्या आईपर्यंत पोहोचला आहे. काजल असं आरोपी महिलेचं नाव असून तिने आपला गुन्हा कबूल केला आहे. आपले विवाहबाह्य संबंध असून पतीला सोडायचं आहे, मात्र प्रियकर माझ्या मुलीला स्विकारण्यास तयार नव्हता. यामुळे मी तिची गळा कापून हत्या केली आणि नंतर सुटकेसमध्ये भरुन झाडीत टाकलं असं महिलेने सांगितलं आहे. तसंच महिलेने क्राईम पेट्रोल पाहिल्यानंतर आपल्याला हत्या करण्याची कल्पना सुचली असं पोलिसांना सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी मुझफ्फरपूरच्या मिनापूर येथील रहिवासी भागा तीन वर्षीय मिस्तीचा मृतदेह आढळला होता. एका लाल रंगाच्या सुटकेमध्ये मृतदेह भरलेला होता. मुलीचा मृतदेह आढळल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या प्रकऱणाचा तपास कऱण्यासाठी एक विशेष तपास पथक गठीत केलं होतं. 


फॉरेन्सिक टीमने कुटुंबाच्या घराची पाहणी केली असता त्यांना घरातील लादी, सिंक आणि गच्चीवर रक्ताचे डाग आढळले. मिस्तीची आई बेपत्ता होती. घटनेच्या दिवशी तिने पती मनोजला फोन करुन आपण काकीच्या घऱी जात असल्याचं सांगितलं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. 


मनोजने पत्नी काजलविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी काजलच्या फोनचं लोकेशन मिळवलं आणि धाड टाकली असता ती प्रियकराच्या घरी सापडली. चौकशी केली असता तिने पोलिसांना आपले दोन वर्षांपासून विवाहबाह्य संबंध असून प्रियकरासह राहण्याची इच्छा होती असं सांगितलं. "तिला आपल्या मुलीलाही सोबत न्यायचं होतं, पण प्रियकराची तशी इच्छा नव्हती. महिला गोंधळलेल्या स्थितीत होती. अखेर तिने चाकूने मुलीचा गळा कापला यानंतर लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये मृतदेह भरुन घराशेजारी असणाऱ्या झाडीत फेकून दिला," असं पोलिसांनी सांगितलं आहे.


महिलेने हत्या केल्यानंतर रक्ताचे डाग पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र फॉरेन्सिक टीमला ते आढळले. पोलिसांना हत्येसाठी वापरण्यात आलेलं शस्त्रही सापडलं आहे. "तिने हा खून एकट्याने केला आहे. तिने सांगितलं की ती क्राइम पेट्रोल पाहायची आणि टीव्ही शोच्या काही एपिसोड्समधून तिला आपल्या मुलीची हत्या करण्याची आणि मृतदेह सुटकेसमध्ये भरण्याची कल्पना मिळाली," असं पोलीस म्हणाले. 


पोलिसांना या गुन्ह्यात महिलेच्या प्रियकराची भूमिका असल्याचा संशय आहे का? असं विचारलं असता, अधिकाऱ्याने सांगितलं, "हत्येमध्ये प्रियकराची भूमिका आहे असं दर्शवणारं काही आम्हाला आढळलेलं नाही. म्हणून आम्ही त्याला ताब्यात घेतले नाही. तिने असंही म्हटलं आहे की, क्राईम पेट्रोलपासून प्रभावित होत तिने हा गुन्हा केला असून प्रियकराने हे कराला सांगितलं नाही".