अहमदाबाद: देशभरातील तरुणाईकडून गुरुवारी मोठ्या उत्साहात व्हॅलेंटाईन्स डे साजरा केला जात असताना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. राहुल गांधी आज राजस्थान आणि गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी वलसाड येथील एका जाहीर सभेत घडलेला प्रसंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या सभेच्यावेळी राहुल गांधी व्यासपीठावर बसले होते. त्यावेळी काही महिला कार्यकर्त्या त्यांचे स्वागत करण्यासाठी व्यासपीठावर आल्या. नेहमीप्रमाणे राहुल गांधी पुष्पगच्छ स्वीकारण्यासाठी जागेवर उठून उभे राहिले. यावेळी एका महिलेने सगळ्यांदेखत राहुल गांधी यांना गालावर चुंबन दिले. या अनपेक्षित प्रकारामुळे राहुल गांधी यांनाही थोड्यावेळासाठी काय करावे, हे सुचले नाही. यानंतर त्यांनी फारशी प्रतिक्रिया न देता हसतहसत कार्यकर्त्यांनी दिलेल्या हारतुऱ्यांचा स्वीकार केला. मात्र, तोपर्यंत हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला होता. 



तत्पूर्वी राजस्थान येथील भाषणातही त्यांनी कार्यकर्त्यांना संघाच्या द्वेषाच्या विचारधारेला प्रेमाने उत्तर देण्याचे आवाहन केले. मोदींच्या द्वेषावर माझे प्रेम भारी पडत असल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी राहुल यांनी नागरिकत्व विधेयकावरून ईशान्य भारतात निर्माण झालेल्या तणावाचा संदर्भ देत भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार हल्ला चढवला. भाजपने ईशान्य भारताला तणावाच्या वणव्यात लोटून दिले आहे. मात्र, आम्हाला हे प्रदेश प्रेमाने जिंकायचे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत मला, माझ्या कुटुंबाला, काँग्रेस पक्षाला दूषणे देत असतात. पण मी ते सगळे विसरून त्यांना संसदेत मिठी मारली. माझ्या त्या कृतीने त्यांच्या मनातील द्वेषावर मात केली होती, असे राहुल यांनी सांगितले.