नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 च्या रणात आम आदमी पार्टी नेहमी वादामुळे चर्चेत येत आहे. आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर वारंवार हल्ले होत आहेत. या हल्ल्यामागे मोदी सरकारचा हात असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. आता तर पश्चिम दिल्लीचे आप उमेदवार बलबीर सिंह जाखड यांचा मुलगा उदय जाखडने 'आप'वर गंभीर आरोप केले आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी माझ्या वडीलांकडून आम आदमी पार्टीने 6 कोटी रुपये घेतल्याचा आरोप उदय जाखड यांनी केला आहे. न्यूज एजंसी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला. लोकसभा निवडणुकीचे तिकिट देण्यासाठी माझ्या बाबांकडून आपने 6 कोटी रुपये घेतल्याचे ते म्हणाले. माझ्याकडे यासंदर्भातील सर्व पुरावे असल्याचेही ते म्हणाले. 



बलबीर सिंह जाखड हे तीन महिन्यांपुर्वी आम आदमी पार्टीत आले आहेत. त्यांना आम आदी पार्टीची उमेदवारी देण्यात आली आहे. आम आदमी पार्टीवर पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप राज्यसभा निवडणुकीवेळी देखील झाला होता. आम आदमी पार्टीने चांदनी चौक येथून पंकज गुप्ता, उत्तर पूर्व दिल्लीतून दिलीप पांडे, पुर्व दिल्लीतून आतिशी, नवी दिल्लीतून ब्रजेश गोयल, उत्तर-पश्चिम दिल्लीतून गगन सिंह आणि दक्षिण दिल्लीतून राघव चड्ढा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.