पंजाब, मोगा : दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) सध्या पंजाबच्या (Punjab Assembly Elections) दौऱ्यावर आहेत. पंजाबमधील मोगा इथं एका संभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी मोठं आश्वासन दिलं आहे. केजरीवाल यांनी दिलेल्या या आश्वासनाची सध्या जोरदार चर्चा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यास प्रत्येक महिलेला दरमहा 1000 रुपये दिले जातील, असं आश्वासन केजरीवाल यांनी दिलं आहे. पेन्शन व्यतिरिक्त हे पैसे मिळणार आहेत, ही जगातील सर्वात मोठी महिला सक्षमीकरण मोहीम असेल असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. (Will give Rs 1,000 to every woman monthly, says Arvind Kejriwal)


मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले की, आता विरोधक म्हणतील यासाठी पैसे कुठून येणार? पंजाबमधून माफिया संपवल्यास पैसे आपोआप येतील. मुख्यमंत्री विमान खरेदी करतात. मी खरेदी केलं नाही. मी तिकिट मोफत केलं. केजरीवाल जे बोलतात तेच करतात, ही निवडणूक पंजाबचं भवितव्य बदलू शकते असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.


आता घरातील वडिल किंवा पती कोणाला मत द्यायचं हे सांगणार नाही, तर महिलाच ठरवतील कोणत्या उमेदवाराला मत द्यायचं, असं केजरीवाल यांनी ठणकावून सांगितलं. सर्व महिलांनी घरात सांगा की 'इस बार, बस एक बार केजरीवाल'. केजरीवाल सरकारला एकदा संधी देऊन पाहा असं आवाहन यावेळी केजरीवाल यांनी केलं.


सध्या एक बनावट केजरीवाल फिरत आहे. मी जे वचन देतो. दोन दिवसांनी तोही तेच वचन देतो. मी म्हणालो वीज मोफत करणार तर तोही वीज मोफत करण्याचं आश्वासन देतो. पण संपूर्ण देशात वीज बिल शून्य करणं केवळ केजरीवालच करू शकतात, असंही केजरीवाल यांनी म्हटलं आहे.