नवी दिल्ली  : पीयुष गोयल यांनी यंदाच्या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अनेक क्षेत्रांतून त्याविषयीच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. त्यांनी अनेक मोठ्या नव्या घोषणा करत शेतकरी, मध्यम वर्ग, वृद्ध व्यक्ती यांच्यासाठीच्या मोठ्या निर्णयांची घोषणा केली. ज्यामध्ये वार्षिक उत्पन्नामध्ये करसवलत देत मध्यमवर्ग आणि नोकरदार वर्गाच्या अनुशंगाने महत्त्वाची घोषणा करण्यात आली. पण, गोयल यांच्या या घोषणेनंतर मात्र विरोधी पक्षनेत्यांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. त्यातच देशात स्वत:च्या देशात तरी सर्जिकल स्ट्राईक करु नका, असं म्हणत आपचे खासदार संजय सिंह यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'एएनआय' या वृत्तसंस्थेशी संवाद साधत त्यांनी आपलं मत मांडलं. यावेळी त्यांनी शेतकरी आणि कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला. सोबतच हंगामी अर्थमंत्र्यांच्या सर्जिकल स्ट्राईक या शब्दाच्या वापरावर आक्षेपही घेतला. 'शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची आवकही मिळत नाही. मुळात त्यांना सरकारने कर्जमाफी दिलीच कुठे? करमाफी, इंसेंटीव्हच्या नावाखाली मोठ्या आणि जास्त आर्थिक मिळकत असणाऱ्या वर्गाला तुम्ही कर्जमाफी, करमाफी दिली. हजारो आणि लाखो करोडोंची सूट त्यांना दिली. काही मोजक्या व्यक्तींवर असणाऱ्या कर्जासाठी शेतकऱी वर्गाची गळचेपी. त्यांच्यासाठी दररोज अवघ्या सतरा रुपयांची तरतूद केली', असं म्हणत त्यांनी अ्थसंकल्पाविषयी आपलं मत स्पष्ट केलं आणि मोदी सरकारवर निशाणाही साधला. 



यावेळी 'विजय मल्ल्या, नीरव मोदी, ललित मोदी, मेहूल चोक्सी हे करोडो रुपयांची लूट करून देशातून पलायन करणार पण, त्यासाठी काही पावलं न उचलता उलटपक्षी कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना अवघे सतरा रुपये देण्याच्या निर्णयाला तुम्ही काय म्हणून एका मोठ्या निर्णयाचा दर्जा देता?', हा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. 


'हा भारत देश आहे निदान याचंतरी भान ठेवा. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्यापर्यंत ठिक होतं आता भारतातही सर्जिकल स्ट्राईक करणार का? निदान या भाषेचा वापर तरी करु नका', असं म्हणत मिश्किल हास्य करत सिंह यांनी गोयल यांच्यावर टीका केली. शत्रू राष्ट्रावर जी कारवाई केली तीच तुम्ही भारतावरही करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित करत मोदी सरकारतर्फे सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पावर तीव्र  शब्दांत नाराजी व्यक्त केली .