नवी दिल्ली : आरूषी आणि हेमराज दुहेरी हत्याकांड प्रकरणात अलाहाबाद हायकोर्टानं निर्दोष ठरवल्यानंतर राजेश आणि नुपूर तलवार या डॉक्टर दाम्पत्याची सोमवारी दासना जेलमधून मुक्तता झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या चार वर्षांपासून ते तुरूंगवास भोगत होते. सोमवारी संध्याकाळी 5 वाजता त्यांनी तुरूंगातून सुटका झाली. त्यावेळी तलवार दाम्पत्याची दृश्यं टिपण्यासाठी मीडियावाल्यांनी मोठी गर्दी केली होती. 


जेलमधून सुटल्यानंतर पोलिसांनी त्यांना नोयडा येथील जलवायू विहार या त्यांच्या घरी नेऊन सोडलं. 2008 मध्ये तलवार दाम्पत्याची अल्पवयीन मुलगी आरूषी आणि घरातील नोकर हेमराज यांची निर्घृण हत्या करण्यात आली. 


ही हत्या तलवार दाम्पत्यानंच केली असावी, असा त्यांच्यावर आरोप होता. मात्र सबळ पुराव्याअभावी कोर्टानं त्यांना दोषमुक्त केलं. त्यामुळं आरूषी आणि हेमराज यांच्या हत्येचं गूढ अजूनही उकललेलं नाही.