मुंबई : 'गोल्डन ग्लोब रेस'दरम्यान जखमी झाला तरी अभिलाष टॉमीची जिगर कायम आहे. दक्षिण हिंदी महासागरात फ्रेंच नौकेने जखमी अवस्थेतल्या अभिलाष टॉमींना वाचवलंय. समुद्र आणि अभिलाषचं फार जवळचं नातं आहे... समुद्रावर तो यापूर्वीही स्वार होत आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर्यावर्दी आणि समुद्र यांच्यात असतं एक खास नातं... समुद्र असतो त्यांचा सखा... हा समुद्र कधी कधी खवळतोही... नौदल कमांडर अभिलाष टॉमी यांनी गोल्डन ग्लोब रेसच्या दरम्यान याचा अनुभव घेतला. दक्षिण हिंदी महासागरात वादळ आणि खवळलेल्या समुद्रामुळं टॉमींच्या 'थुरिया' या स्वदेशी बनावटीच्या नौकेचं नुकसान झालं. टॉमीही जखमी झाले. त्यांच्या पाठिला जबर दुखापत झाली. ते हालचालही करु शकत नव्हते. 


जखमी अवस्थेतही टॉमी यांनी आपली जिगर सोडली नाही. त्यांनी आपल्या जवळच्या इपीआयआरबी उपकरणाद्वारे संपर्क साधत आपण दक्षिण हिंदी महासागरात नेमके कोठे आहेत? हे भारतीय नौदलाच्या आणि फ्रान्सच्या मदत पथकाला कळवले. फ्रेंच नौका ओरीसीस टॉमी यांच्यापर्यंत पोहोचली आणि टॉमी यांची सुटका झाली.


...आणि मदत पोहचली!


'गोल्डन ग्लोब रेस २०१८' मध्ये भारतीय नौदलाचे कमांडर आणि साहसी समुद्र सफरींचा गाढा अनुभव असलेल्या अभिलाष टॉमी या उत्साहात सहभाग घेतला. त्यांच्या सोबतीला होती जिगर आणि ३६ फुटी नौका थुरिया... पण दक्षिण भारतीय समुद्रात या नौकेला सामना करावा लागता तो ताशी १३० किलोमीटर वेग असलेल्या १० मीटर उंच लाटांशी... शुक्रवारी या राक्षसी लाटांच्या तडाख्यानं थुरियाची मोडतोड झाली तसेच टॉमीही जबर जखमी झाले. हे सगळं घडलं तेव्हा थुरिया होती पर्थपासून साधारण १९०० मैलांवर... 


बचावासाठी भारतीय नौदलानं आएनएस सातपुडा आणि आयएनएस ज्योती या सुसज्ज युद्धनौका रवाना केल्या. भारतीय नौदलाच्या पी ८ आय या विमानानेही मदत कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भारताचं नौदल मुख्यालय आणि ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमधील नौदलाचे केंद्र यांच्यात समन्वय साधत ही अवघड मदत मोहीम पार पाडली.


गोल्डन ग्लोब रेस


गोल्डन ग्लोब रेस ही अतिशय कठिण अशी नौकानयन स्पर्धा आहे. यंदा १ जुलैला फ्रान्समधील ला सेब्ला दोलॉन येथून ही स्पर्धा सुरु झाली. १८ जिगरबाज दर्यावर्दी यात सहभागी झालेत. ३० हजार सागरी मैलांचा प्रवास या स्पर्धेत पूर्ण करावा लागतो. वादळात सापडून अपघातात सापडण्यापूर्वी ८४ दिवसांत साडे दहा हजार मैलांचा आव्हानात्मक प्रवास करुन टॉमी तिसऱ्या क्रमांकावर होते. पण थुरिया वादळात सापडली आणि हा प्रवास खंडित झाला. लाटांच्या तडाख्यानं थुरियाची डोलकाठी तुटली आणि टॉमी यांच्या पाठीला जबर तडाखा बसला. कुशल दर्यावर्दी असल्यानं टॉमी यांनी त्याही स्थितीतून मार्ग काढला.


नवीन तंत्रज्ञान वापरण्याची बंदी


ही एक अवघड स्पर्धा असते कारण स्पर्धकाकडे फक्त सॅटेलाईट फोन असतो, पण त्याचा वापर केवळ मदत अपघात झाला किंवा वैद्यकीय मदत लागली तरच करायचा असतो. नौकानयन, दिशादर्शन किंवा अन्य कुठल्याही कामासाठी हा सॅटेलाईट फोन वापरता येत नाही. यात फोनचा वापर करत टॉमी यांनी सुटका करुन घेतली. कमांडर अभिलाष यांनी २०१२-१३ मध्ये १५० दिवसांची यशस्वी सागर परिक्रमा केली होती.


अभिलाष कुशल वैमानिकही!


अभिलाष टॉमी मूळचे केरळचे... भारतीय नौसेनेच्या वायुदलात ते २००१ मध्ये वैमानिक म्हणून दाखल झाले. डॉर्निअर विमान ते कुशलतेनं चालवतात. नौकानयनात पूर्वीपासून रस असल्यानं त्यांनी २००४ पासून यॉट सेलिंगला सुरवात केली. आता विमानाबरोबरच ते नौकाही कुशलतेनं चालवतात. पूर्वीच्या सागरपरिक्रमेच्या वेळी त्यांची नौका 'म्हादेई' ऑस्ट्रेलियाजवळच महाभयंकर वादळात सापडली होती. त्यातून ते सहिसलामत बाहेर पडले होते. २०१८ मध्ये गोल्डन ग्लोब रेसमध्ये त्यांच्यासोबत होती ती 'तुरिया'... पुन्हा वादळाचं संकट आलं. त्यातूनही ते सहिसलामत बाहेर पडले... धाडस, साहस, कर्तबगारी, जिगर, थरार म्हणजेच आहे कमांडर अभिलाष टॉमी याचं आयुष्य.... अशा संकटांनी हा वीर नाउमेद होत नाही... संकटावर स्वार होत तो पुन्हा सज्ज होतो तो नव्या साहसासाठी... तुरियाला अपघात झाल्यामुळं त्याला माघार घ्यावी लागली असली तरी तो पुन्हा नव्याने साहसाला सामोरा जाईल याची सर्वांनाच खात्री आहे.