मुंबई : तुम्ही जर एसी किंवा फ्रीज घेण्याचा विचार करत असाल तर झटपट फ्रीज आणि एसी घ्या. कारण लवकरच रेफ्रिजरेटर आणि एसीच्या किमती वाढणार आहेत. म्हणूनच जर सध्या 5 स्टार फ्रीज किंवा एसी घेण्याचा विचार असेल तर आजच घेऊन टाका. नाहीतर वाढत्या महागाईत खिशाला कात्री बसू शकते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1 जुलैपासून 5 स्टार रेटिंग असलेल्या एसीची किंमत वाढणार आहे. तर पुढच्या वर्षीपासून फ्रीजच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे. एसीच्या रेटिंगमध्ये बदल करण्यात येणार आहे. त्यामुळे याचा परिणाम थेट उत्पादनाच्या किंमतीवर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. 


रेटिंग जेवढे जास्त तेवढी वाढती किंमत असं सरळ साधं गणित आहे. जास्त रेटिंग म्हणजे प्रोडक्ट अधिक एनर्जी एफिशिएंट आहे असं समजलं जातं. यासोबत ते ईकोफ्रेंडली आणि कमी वीज खाणारे असल्याने अधिक फायदेशीर असतात. त्यामुळे असे एसी घेण्याकडे कल जास्त असतो. 
 
या रेटिंगमध्ये बदल होणार असल्याने किंमतीमध्ये 7 ते 10 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. नव्या रेटिंगनुसार आता जे 5 स्टार एसी आहेत त्यांना 4 स्टारमध्ये मोजलं जाणार आहे. पुढच्या महिन्यात येणारे एसी हे आताच्या एसीपेक्षा अधिक पटीने उत्तम असतील अशी माहिती मिळाली आहे. 


जर तुम्ही नवीन एसी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही 1 जुलै 2022 पूर्वी तो खरेदी करू शकता. हे तुम्हाला कमी किंमत आणि शक्यतो सवलत देखील देईल. पण 1 जुलै 2022 नंतर तुम्हाला नक्कीच जास्त पैसे मोजावे लागतील.