CCTV Car Hit Two Wheeler: तामिळनाडूमधील (Tamil Nadu) कोइम्बतूरमध्ये (Coimbatore) एक धक्कादायक अपघात घडला आहे. ओव्हरटेक करण्याच्या नादात एका कारचालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या दुचाकीवरुन एक छोटा मुलगा आणि त्याचे वडील प्रवास करत होते. या अपघातामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. तर त्याचा मुलगा गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. धडक झाल्याचा क्षण सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडीओ अंगाचा थरकाप उडवणार आहे.


नक्की काय घडलं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही दुर्घटना शनिवारी (24 जून 2023 रोजी) सायंकाळी 5 वाजून 21 मिनिटांनी झाली. पोलाची येथे राहणारे 38 वर्षीय जाकिर हुसेन मुलगा अजमलबरोबर (वय 15 वर्ष) दुचाकीवरुन जात होते. त्रिची येथील एका कब्बडीच्या सामन्यासाठी जाकिर अजमलला सोडण्यासाठी जात असतानाच वेलांधवलम येथे त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या ठिकाणी विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारचालकाने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी विरुद्ध लेनमध्ये भरधाव वेगात कार घातली. मात्र त्याचवेळी समोरुन जाकिर यांची दुचाकी येत होती. 



हेल्मेट घातलेलं असतानाही मृत्यू


ओव्हरटेक करणाऱ्या कारने जाकिरच्या बाईकला समोरुन जोरदार धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की जाकिर आणि त्यांचा मुलगा 10 फूट हवेत उडाले. जाकिर यांची बाईकही हवेत उडाली आणि यांच्या गाडीच्या मागून येणाऱ्या टोम्पो ट्रॅव्हलर गाडीची समोरची काच तोडून बाईक या गाडीमध्ये घुसली. जाकिर यांना या टोम्पो ट्रॅव्हलर गाडीचा फटका बसला आणि ती रस्त्यावर रक्तबंबाळ होऊन पडले. जाकिर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा रस्त्याच्या एका कडेला फेकला गेला. सुदैवाने त्यांच्या मुलाचा जीव वाचला आहे. मात्र तो गंभीर जखमी झाला आहे. जाकिर यांनी हेल्मेट घातलेलं असतानाही त्यांचा जागीच मृत्यू झाला इतका हा भयानक अपघात होता. जाकिर यांच्या मृतदेहापासून काही अंतरावर हेल्मेट पडल्याचं पोलिसांना आढळून आलं. 



कारचा शोध घेत आहेत पोलीस


दुर्घटनेची माहिती मिळताच चावडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जाकिरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या प्रकरणात हीट अॅण्ड रनचा गुन्हा दाखल केला असून धडक मारणाऱ्या कारचा शोध पोलीस घेत आहेत.