वंदे भारतवर दगडफेक का केली? तरुणाने केले धक्कादायक खुलासे `ट्रेनचा वेग कमी होताच...`
वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यामागील कारण समोर आलं आहे. हे कारण ऐकल्यानंतर अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. युपी एटीएस याप्रकरणी तपास करत होतं.
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये वंदे भारत एक्स्प्रेसवर (Vande Bharat Express) दगडफेक करण्यात आल्याची घटना समोर आली होती. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत याप्रकरणी एटीएसने तपास सुरु केला होता. तपासादरमयान हुसैन उर्फ शाहिद याला अटक करण्यात आली. चंदौलीच्या मुगलसराय परिसरातू तमयाला बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान त्याची चौकशी केली असताना दगडफेक करण्यामागील धक्कादायक कारण समोर आलं आहे. दगफडेक करत फक्त खिडक्या फोडून ट्रेनचा वेग कमी करणं इतकाच त्यांचा हेतू नव्हता. तर खिडकीच्या शेजारी बसलेल्यांचे मोबाईल लंपास करण्याची योजना ते आखत होते.
2 ऑक्टोबरला वाराणसी येथून दिल्लीला निघालेल्या वंदे भारत एक्स्प्रेसवर कानपूरच्या पनकी स्टेशनजवळ दगडफेक करण्यात आली होती. यावेळी ट्रेनच्या C7 डब्याची काच फुटली होती. दगडफेकीमुळे घाबरलेले प्रवासी आपल्या सीटवर खाली वाकून बसले होते. दगडफेक झाल्यानंतर आरपीएफ आणि जीआरपी कंट्रोल रुमला घटनेची माहिती देण्यात आली. यानंतर अज्ञात व्यक्तींविरोधात रेल्वे संपत्तीचं नुकसान तसंच इतर कलमांतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तपासात धक्कादायक खुलासे
वाराणसीच्या एटीएस युनिटने याप्रकरणी तपास सुरु केला होता. त्यांनी आरोपी हुसेन उर्फ शाहीदला अटक केली. चौकशीदरम्यान त्याने खुलासा केला की, दगडफेक करण्यामागे ट्रेनचा वेग कमी करणं हा हेतू होता, जेणेकरुन खिडकीजवळ बसलेल्या प्रवाशांचा मोबाईल सहजपणे चोरु शकू. हा खुलासा झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणाही हैराण झाल्या आहेत.
दगडफेकीची पहिलीच घटना नव्हे
याआधीही वंदे भारत ट्रेनवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. कानपूरशिवाय इटावामध्येही अशी घटना समोर आली आहे. या घटनांमुळे रेल्वे आणि सुरक्षा दलांसमोर आव्हान निर्माण झाले आहे.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने सुरक्षा वाढवली असून वंदे भारत एक्स्प्रेसच्या मार्गावर अतिरिक्त दक्षता घेण्यात येत आहे.आरपीएफ आणि जीआरपीचे संयुक्त पथक प्रवाशांच्या सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत.पोलिसांची पाच पथके या प्रकरणाचा तपास करत असून अन्य आरोपींना पकडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कटाचा पर्दाफाश झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर पावले उचलली जात आहेत, जेणेकरून अशा घटनांना आळा बसेल.