Prakash Raj on Pawan Kalyan: बॉलिवूड आणि दाक्षिणात्य अभिनेते प्रकाश राज आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. राजकीय तसंच वेगवेगळ्या विषयांवर ते परखडपणे आपली मतं मांडत असतात. तिरुपती मंदिरातील लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरण्यात आल्याच्या आरोपांमुळे सध्या खळबळ उडालेली असताना प्रकाश राज यांनी त्यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पवन कल्याण (Pawan Kalyan) यांना सुनावलं आहे. तिरुपती मंदिरात प्रसादात प्राण्यांची चरबी वापरणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशातील मंदिरांशी संबंधित समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ‘सनातन धर्म संरक्षण मंडळ’ (Sanatana Dharma Rakshana Board) स्थापन करण्याची सूचना पवन कल्याण यांनी केली आहे. यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांनी हा मुद्दा देशपातळीवर नेल्याबद्दल टीका केली आहे. 


पवन कल्याण यांचं ट्विट


पवन कल्याण यांनी तिरुपती मंदिरातील प्रसादावरुन पेटलेल्या वादावर म्हटलं आहे की, "तिरुपती बालाजी प्रसादमध्ये मिसळलेल्या प्राण्यांच्या चरबीच्या (माशाचे तेल, डुकराचे मांस आणि गोमांस चरबी) निष्कर्षांमुळे आम्ही सर्वजण व्यथित झालो आहोत. वायसीपी सरकारने स्थापन केलेल्या टीटीडी बोर्डाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. आमचे सरकार कठोर निर्णय घेण्यास वचनबद्ध आहे. परंतु, यामुळे मंदिरांचे अपवित्रीकरण, त्यांच्या जमिनीचे प्रश्न आणि इतर धार्मिक प्रथांवरील अनेक मुद्द्यांवर प्रकाश पडतो".


ते पुढे म्हणाले, "संपूर्ण भारतातील मंदिरांशी संबंधित सर्व समस्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर 'सनातन धर्म संरक्षण मंडळ' स्थापन करण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय स्तरावर धोरणकर्ते, धार्मिक प्रमुख, न्यायपालिका, नागरिक, मीडिया आणि इतरांनी यावर चर्चा केली पाहिजे. 'सनातना धर्मा'ची कोणत्याही प्रकारची विटंबना थांबवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे".



प्रकाश राज यांची टीका


पवन कल्याण यांच्या पोस्टवर प्रकाश राज यांनी नाराजी जाहीर केली आहे. "प्रिय  पवन कल्याण... हे अशा राज्यात घडले आहे जिथे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. कृपया या प्रकरणाचा तपास करा. दोषींचा शोध घ्या आणि कठोर कारवाई करा. तुम्ही भीती का पसरवत आहात आणि हा मुद्दा राष्ट्रीय स्तरावर का नेत आहात? आपल्या देशात पुरेसा जातीय तणाव आहे (केंद्रातील तुमच्या मित्रांचे आभार)," असं म्हणत प्रकाश राज यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला.



प्रकाश राज हे उजव्या विचारसरणीच्या राजकारणाचे जोरदार टीकाकार आहेत. विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर ते अनेकदा आपली मतं स्पष्टपणे मांडत असतात. आपल्या विधानांमुळे अनेकदा ते अडचणीतही येतात. यामुळे त्यांच्यावर हिंदू-विरोधी, राष्ट्रविरोधी असल्याचे आरोपही झाले आहेत.