नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात आले. भाजपा प्रणित पक्षांना या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आणि पुन्हा एकदा देशात भाजपाचीच हवा पाहायला मिळाली. या साऱ्यामध्ये पश्चिम बंगालमधील जागांवरही साऱ्या देशाचं लक्ष लागलेलं होतं. हिंसाचार, आरोप-प्रत्यारोपांची सत्र या मुद्द्याच्या बळावर या चर्चांनी अधिकच जोर धरला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प. बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेल्या अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ या सध्याच्या घडीला राजकीय विश्वात अनेकांचं लक्ष वेधत आहेत. पण, त्यांची ही राजकीय सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. 


मंगळवारी मिमी आणि नुसरत यांनी सोशल मीडियावर संसदेतील त्यांच्या पहिल्या दिवसाचे फोटो पोस्ट केले. लोकसभा निवडणुकांनंतर संसदेत जाण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. या खास दिवसासाठी त्यांनी खास स्टाईल स्टेमेंट ठेवत पाश्चिमात्य वेशभूषेला प्राधान्य दिलं होतं. पण, ही बाब मात्र अनेकांना खटकली. किंबहुना अनेकांनीच त्याविषयी नाराजीही व्यक्त केली. 



जादवपूर मतदार संघातून तृणमूलकडून निवडून आलेल्या मिमी चक्रवर्ती यांनी पांढरा शर्ट आणि जीन्स, तर बसिरहाटमधून निवडून आलेल्या नुसरत जहाँ यांनी महरुनी रंगाच्या पेप्लम झिप टॉप आणि पँटला प्राधान्य दिलं होतं. सहसा संसदेत येणाऱ्या सेलिब्रिटींनी अनेकदा भारतीय वेशभूषेला पसंती दिल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, पश्चिम बंगालच्या विजयी उमेदवारांचा अंदाज मात्र सर्वांहून वेगळाच ठरला. ज्यामुळे, 'हे संसद आहे, फोटोशूटची जागा नव्हे' असं म्हणज काही नेटकऱ्यांनी त्यांना धारेवर घेतलं. 




'कोणत्या ठिकाणी कशा प्रकारचे कपडे घालून जावं हे तुम्हाला ठाऊक नाही. ही एक सरकारी कामाची जागा आहे, फोटोशूटचं ठिकाण नव्हे....', 'तुम्ही तिथे गेलेल्या पर्यटकांसारखे दिसत आहात', अशा असंख्य कमेंट्सच्या माध्यमातून त्यांच्यावर निशाणा साधण्यात आला. तेव्हा आता साडी नेसण्याचा सल्ला देणाऱ्या नेटकऱ्यांचं म्हणणं त्या किती मनावर घेतात हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.