चोराने राफेलची कागदपत्रं परत आणून दिली वाटतं, चिदंबरम यांचा सरकारला टोला
राफेल प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.
नवी दिल्ली: संरक्षण मंत्रालयातून राफेलच्या कागदपत्रांची चोरी झाल्याच्या दाव्यावरून घुमजाव करणारे अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांच्यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी शनिवारी निशाणा साधला. चिदंबरम यांनी ट्विट करून म्हटले आहे की, बुधवारी सरकारने सर्वोच्च न्यायालयात राफेल करारसंदर्भातील कागदपत्रे चोरीला गेल्याचा दावा केला. त्यानंतर शुक्रवारी मूळ कागदपत्रे नव्हे तर त्याच्या छायांकित प्रती चोरीला गेल्याचे सरकारने सांगितले. याचा अर्थ चोराने गुरुवारी राफेलची कागदपत्रे परत आणून ठेवली असतील, असा उपरोधिक मजकूर चिदंबरम यांनी ट्विटमध्ये लिहला आहे.
६ मार्चला सर्वोच्च न्यायालयात राफेलच्या पुनर्विचार याचिकेवर सुनावणी पार पडली होती. यावेळी केंद्र सरकारची बाजू मांडणारे अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी याचिकाकर्त्यांकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवर आक्षेप घेतला. हे पुरावे गोळा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयातील माहिती चोरण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी सुरु असून लवकरच दोषींवर अधिकृत गोपनीयता कायद्यातंर्गत कारवाई होणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला होता.
मात्र, शुक्रवारी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना के.के. वेणुगोपाल यांनी आपल्या विधानावरून घुमजाव केले. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर विरोधकांकडून संरक्षण मंत्रालयातून राफेल कराराची फाईल चोरीला गेल्याचा दावा केला जात आहे. मात्र, हे पूर्णपणे चुकीचे असल्याचे के.के. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले होते.