भोपाळ : मध्य प्रदेशमधील सत्ता संघर्ष आता सुप्रीम कोर्टात पोहोचलं आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपने सुप्रीम कोर्टात य़ाचिका केली आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही याचिका दाखल केली आहे. विधानसभा स्थगित केल्यामुळे मध्यप्रदेशमधील राजकीय घडामोडींनी आणखी एक वेगळं वळण घेतलं आहे. राज्यात विधानसभेचं कामकाज 26 मार्च पर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री कमलनाथ यांना बहुमत सिद्ध नाही करावं लागणार आहे. ANI च्या माहितीनुसार, कोरोनामुळे मध्य प्रदेशच्या विधानसभेचं कामकाज स्थगित करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय जनता पक्षाने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर काँग्रेसने देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्याची तयारी केली आहे. काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार बंगळुरुमध्ये ज्या आमदारांना ठेवण्यात आलं आहे. त्याच्य़ा विरोधात काँग्रेस याचिका दाखल करु शकते. काँग्रेसचे एकूण १६ आमदार कुठे आहेत याची माहिती नसल्याने काँग्रेस कोर्टात याचिका दाखल करु शकते. त्यामुळे काँग्रेस-भाजपमधील हा सत्तासंघर्ष आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे.



विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांनी विधानसभेचं कामकाज स्थगित केल्याने कमलनाथ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी आता त्यांना २६ मार्च पर्यंत वेळ मिळाला आहे.


मध्यप्रदेश मधील राजकीय नाट्य आता आणखी रंगू लागलं आहे. भाजपचे सर्व आमदार एकाच बसमधून राजभवन येथे पोहोचले आहेत. भाजप आमदार आणि राज्यपालांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.



भाजप आमदारांच्या आधी काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी देखील राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. दिग्विजय सिंह यांनी म्हटलं की, 'माझे राज्यपाल यांच्यासोबत चांगले संबंध आहे. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही.'