नवी दिल्ली : काश्मीरप्रश्नावरून पाकिस्तान भारताविरोधात कायम कुरापती करत आलाय. पण एव्हढ्यावरच न थांबता पाकनं आणखी एक नापाक कृती केलीय. पाकिस्ताननं आता चक्क कोहिनूर हिऱ्यावर आपला दावा केलाय. त्यामुळे भारत-पाक नव्या संघर्षाला तोंड फुटणारंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारताची शान असलेला कोहिनूर हिरा सध्या टॉवर ऑफ लंडनमधील संग्रहालयात आहे. पण याच हिऱ्यावरून पाकिस्ताननं मखलाशी केलीय. कोहिनूर आमचाच असल्याचा दावा पाकिस्तानने केलाय. इतकंच नाही तर त्यासाठी लाहोर हायकोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय. पाकिस्तान सरकारने महाराणी एलिझाबेथ यांच्याकडून कोहिनूर पुन्हा आणावा अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आलीय. 


कोहिनूर हिऱ्याचा इतिहास 


कोहिनूर जगातील सर्वात महागडा हिरा असून 108 कॅरेटच्या या हिऱ्याची किंमत जवळपास 10 अब्ज इतकी आहे. असं म्हणतात सर्वात आधी म्हणजे 1304 मध्ये मालवाचे राजे महलाक देव यांच्या खजिन्यात हा हिरा होता. 1526च्या पानिपत युद्धात बाबरने आगऱ्याच्या किल्ल्यातून हा हिरा मिळवला. त्यानंतर बराच काळ हा हिरा मुघलांच्या ताब्यात होता. 1739 मध्ये ईराणी शासक नादीर शाहानं मुघल शासक मोहम्मद शाहाचा पराभव करून कोहिनूरवर कब्जा केला. 1747 मध्ये नादीर शाहाचा नातू शाहरूख मिर्झाच्या ताब्यात कोहिनूर आला. पुढे शाहरूख मिर्झानं आपला सेनापती अहमदशहा अब्दालीला कोहिनूर भेट म्हणून दिला. पुढे अब्दालीचा वंशज शुजा शाह लाहोरला कोहिनूर घेऊन आला. 1813 च्या सुमारास पंजाबचे महाराज रणजित सिंह यांनी हा हिरा आपल्या ताब्यात घेतला. मात्र 1849 मध्ये इंग्रजांनी रणजित सिंह यांचे वारस दिलिप सिंह यांचा पराभव केला. त्यानंतर बिटिशांनी बळजबरीनं कोहिनूर हिरावला तो कायमचाच.


कोहिनूर हा भारताच्या वैभवशाली इतिहासाचा भाग आहे. कोहिनूर भारतात परत यावा यासाठी भारताचे अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. अशात पाकिस्ताननं कोहिनूरची मागणी करून नव्या वादाला तोंड फोडलंय.