शरद पवार गटात यायचच असेल तर...; रोहित पवारांचा `त्या` आमदारांना इशारा
Rohit Pawar News: रोहित पवार यांनी अजित पवार गटातील आमदारांच्या घरवापसीवर प्रतिक्रिया दिली आहे. तसंच, 15 दिवसांचा अल्टिमेटमदेखील दिला आहे.
Rohit Pawar News: लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने दमदार मुसंडी मारली आहे. तर, महायुतीला मोठा फटका बसला आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाल्यानंतर आता अजित पवार गटाचे अनेक आमदार शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीलाही पाच आमदारांनी दांडी मारली असल्याची माहिती समोर आली होती. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी थेट इशारा दिला आहे.
रोहित पवार यांनी आज प्रसारमाध्यमांसोबत संवाद साधला. त्यावेळी त्यांनी म्हटलं आहे की, अजित पवार गटाचे आमदार 15 दिवसांत परत येतील.आमदार येणार ही फक्त आता चर्चा राहणार नाही, असं विधान पुन्हा रोहित पवारांनी केलं आहे. परत येणा-या आमदारांनी यायला उशीर केला तर त्यांना न्याय देता येणार नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. त्यामुळे अजित पवारांच्या आमदारांची घरवापसी होणार असल्याच्या चर्चेला अधिक बळ मिळालं आहे.
काही आमदार खरंच चांगले आहेत परत ते येतील तेव्हा त्यांचं स्वागतच आपण केलं पाहिजे. पण इथं आपण काही उमेदवार तयार करत आहोत. त्याबाबतीत काय होईल हे बघावं लागेल. त्यामुळं तिथे अजित पवार गटातील आमदारांनी आणखी उशीर केला आणि नवीन काही चेहरे पुढे आणले तर मग येणाऱ्या आमदारांना न्याय देता येणार नाही. म्हणून 15 दिवसांत जे काही होईल ते होणार आहे. त्यामुळं 15 दिवसांच्या पुढे गेले तर आम्हाला कदाचित घेता येणार नाही. कारण तिथे नवीन चेहरे दिले जातील, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पवार कुटुंबातील पडलेली फूट भरून निघणार की नाही हे कार्यकर्त्यांना काय वाटते यावर अवलंबून आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीतून विधानसभेला कोण लढणार ते शरद पवार साहेब ठरवणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीच्या वेळी आमच्यातील काही नेते जागांचे सेटिंग करण्यासाठी विरोधकांच्या संपर्कात होते. विधानसभेला त्यांच्याकडून दगा फटका होण्याची शक्यता. पण आम्ही सावध आहोत, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवनिर्वाचित खासदार सुप्रिया सुळे आज प्रथमच बारामतीमध्ये दाखल झाल्या आहेत बारामतीत आज त्यांचा नागरिक सत्कार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर त्या आमदार रोहित पवार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करणार आहेत. संपूर्ण राज्यात लक्षवेधी ठरलेल्या बारामतीच्या निवडणुकीनंतर मतदार संघात आलेल्या सुप्रिया सुळे यांच्या स्वागताची बारामतीकरांनी जोरदार तयारी केली आहे.