नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून चीनने पाकिस्तानची तळी उचलत पुन्हा एकदा भारताला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावर शुक्रवारी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेतील (यूएनएससी) सदस्यांची गुप्त बैठक होणार असल्याचे कळते. ही बैठक चीनच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानने यापूर्वीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेपुढे आपले गाऱ्हाणे मांडणार असल्याचे सांगितले होते. त्यासाठी पाकिस्तानकडून सुरक्षा परिषदेकडे तसे पत्रही पाठवण्यात आले होते. यानंतर चीननेही पत्र पाठवून अशाचप्रकारची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. 


'संघ हा नाझी विचासरणीचा, मोदी सरकारला काश्मीरमधील लोकसंख्येचा चेहरामोहरा बदलायचाय'


मात्र, या सगळ्यामुळे पाकिस्तानला फार फायदा होईल, असे चित्र नाही. कारण, ही बैठक सुरक्षा परिषदेच्या मुख्य चेंबरमध्ये न होता कन्सल्टेशन रूममध्ये होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यावेळी सुरक्षा परिषदेतील सदस्य देशांचे प्रतिनिधी बंद दाराआड गुप्तपणे चर्चा करतील. या बैठकीचे चित्रीकरण केले जाणार नाही. 


मुस्लिमबहुल असल्यामुळेच मोदी सरकारने काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द केला- चिदंबरम


काही दिवसांपूर्वीच भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी संग यांची भेट घेतली होती. तेव्हाच काश्मीरमधील अनुच्छेद ३७० रद्द करणे ही भारताची वैयक्तिक बाब असल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. काश्मीरच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे चीनलगतच्या सीमारेषेवर कोणताही परिणाम होणार नाही, असेही एस. जयशंकर यांनी सांगितले होते.