मद्यधुंद अवस्थेत किंवा सुर्यास्तानंतर समुद्रात जाण्यास बंदी
मद्यधुंद अवस्थेत किंवा सुर्यास्तानंतर समुद्रात पोहण्याच्या इच्छेला तुम्हाला आवर घालावा लागणार आहे.
गोवा : मद्यधुंद अवस्थेत किंवा सुर्यास्तानंतर समुद्रात पोहण्याच्या इच्छेला तुम्हाला आवर घालावा लागणार आहे. राज्यातल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये पोहताना बुडाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर गोवा सरकार ही बंदी घालण्याच विचार करीत आहे.
गोव्याचा नवा पर्यटन मोसम येत्या महिन्यात सुरू होत आहे. देशविदेशातील पर्यटक मौजमजेसाठी गोव्यालाच पसंती देताना दिसतात. इथे वार्षिक सरासरी ६० लाख पर्यटक भेट देतात. यात बहुतांश देशी पर्यटकांचा समावेश असतो आणि समुद्रात बुडून मृत्यू होणारेही बहुतांश देशी पर्यटकच आढळून येत आहेत. गोव्याच्या समुद्रात गेल्या पंधरा दिवसांत एकूण सहाजणांचा बुडून मृत्यू झाला आहे. समुद्रात बुडून मृत्यू पावणार्या पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने पर्यटन आणि पोलिस यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे. हा आकडा गंभीर असून यंत्रणेने यासाठी पाऊल उचलण्यात येत आहे.
सुर्यास्तानंतरच्या घटनेत वाढ
या सगळ्या दुर्दैवी घटना सूर्यास्तानंतर घडल्याचे निदर्शनास आले आहे. समुद्रावर लाइफ गार्ड नसताना, सूर्यास्तानंतर व मद्यप्राशन करून समुद्रात पोहण्यास उतरणारे आपला जीव धोक्यात घालतात. त्यामुळे यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.