`मागच्या सीटवर असताना...`; सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर आनंद महिंद्रा यांनी घेतली शपथ
सायरस मिस्त्री यांचा रविवारी डहाणू येथे भीषण अपघातात मृत्यू झाला.
टाटा सन्सचे (tata sons) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा रविवारी डहाणू येथे भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्यांच्यासह जहांगीर दिनशा पंडोल यांचाही मृत्यू झाला. तर मिस्त्री यांच्यासह प्रवास करणारे इतर दोन प्रवासीही गंभीर जखमी झाले.
रविवारी सायरस मिस्त्री हे अहमदाबाद येथून मुंबईच्या (Ahamadabad to Mumbai)दिशेनं आपल्या मर्सिडीज गाडीतून प्रवास करत होते. मुंबईच्या प्रख्यात स्त्रीरोग विशेषज्ञ अनाहिता पंडोल (55) या गाडी चालवत होत्या.
चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठडयाला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील सीटवर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला. तर अन्य जण जखमी झाले. गाडीला धडक बसताच ‘एअर बॅग’उघडल्या. मात्र सायरस मिस्त्री आणि जहांगीर यांनी सीटबेल्ट न लावल्याने ते फेकले गेले. यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
प्राथमिक तपासानुसार, सायरस मिस्त्री आणि कार अपघातात ठार झालेल्या सहप्रवास्याने सीट बेल्ट घातला नव्हता. अतिवेगाने आणि चालकाच्या घेतलेल्या चुकीच्या निर्यणामुळे हा अपघात झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
यानंतर राज्य सरकारने या भीषण अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे प्रमुख आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी ट्विट केलं आहे. ट्विट करत आनंद महिंद्रा यांनी शपथ घेतली आहे.
आनंद महिंद्र यांनी यापुढे गाडीतून प्रवास करताना सीट बेल्ट लावूनच प्रवास करण्याची शपथ घेतली आहे. "कारच्या मागील सीटवर असतानाही मी नेहमी माझा सीट बेल्ट घालण्याचा संकल्प घेतो. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की तुम्हीही ही शपथ घ्या. आपल्या कुटुंबासाठी आपण हे करु शकतो," असे आनंद महिंद्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.