वय 2 वर्ष, वजन 45 किलो! डॉक्टरांनाही पडलाय प्रश्न
आपली मुलगी इतर लहान मुलांसारखी कधी खेळू शकणार, याची चिंता चिमुकलीच्या पालकांना सतावत आहे
पूजा मक्कड, झी मीडिया, नवी दिल्ली : अवघ्या दोन वर्षांच्या मुलीचं वजन किती असेल, फार तर 7 किलो किंवा जास्तीत जास्त 10 किलो. पण नवी दिल्लीत राहणाऱ्या ख्याती वार्षने या मुलीचं वय आहे तब्बल 45 किलो. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे.
वजन कमी करण्यासाठी ख्यातीवर बॅरियाट्रिक म्हणजे लठ्ठपणा कमी करण्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. खरं तर एवढ्या लहान मुलांवर बॅरियाट्रिक सर्जरी केली जात नाही. त्यासाठी किमान 12 वर्षं वय असणं गरजेचं आहे. पण ख्यातीचं वजन एवढं वाढत होतं की, सर्जरीशिवाय दुसरा पर्यायच नव्हता.
ख्यातीच्या वाढत्या वजनामुळं तिचे पालकही चिंताग्रस्त झाले होते. हे वजन जीवघेणं तर ठरणार नाही ना, अशी भीती त्यांनाही होती. वयाच्या दुसऱ्या वर्षी ख्यातीचं वजन 45 किलो आहे तर वयाच्या चौथ्या वर्षी तीचं वजन 90 किलो होऊ शकतं, अशी भीती पालकांना सतावत होती.
अवघ्या 2 वर्षांच्या मुलीचं एवढं वजन कसं असू शकतं, असा प्रश्न दिल्लीतल्या मोठमोठ्या डॉक्टरांना पडलाय. या चिमुकलीचं वजन वाढण्याचं कारण काय, याचं निदान करणं डॉक्टरांनाही अवघड झालं आहे.
तब्बल दोन आठवड्यानंतर आता हळुहळु सर्जरीचे परिणाम दिसू लागलेत. ख्यातीचं वजन 5 किलोनं कमी झालंय. मात्र अजूनही तिला हालचाल करण्यासाठी व्हिल चेअरचाच आधार घ्यावा लागतोय. पण डॉक्टरांनी अजून आशा सोडलेली नाही.
तर दुसरीकडं आपली मुलगी इतर लहान मुलांसारखी कधी खेळू शकणार, याची चिंता ख्यातीच्या पालकांना सतावतेय.