Sabarmati Ayesha Suicide Case : आत्महत्येपूर्वी हसत बनवला व्हिडिओ; त्यांनतर मृत्यूला कवटाळलं
सुंदर हसण्यामागे दडलं होतं खूप दुःख
मुंबई : प्रत्येकजण दररोज वेगवेगळ्या तणावातून जात असतो. काही जण त्या तणावाशी दोन हात करतात तर काही जण त्या तणावात मृत्यूला कवटाळतात. अशाच भावनांची गुंतागुंत असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ( Ahmedabad Ayesha Suicide Case ) या व्हिडिओत तरूणीने आत्महत्येपूर्वी हसता हसता एक व्हिडिओ बनवला आणि त्यानंतर नदीत उडी मारून तिने मृत्यूला कवटाळलं.
अहमदाबादमध्ये एका महिलेने आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ तयार केला. यामध्ये तिने आपल्या आयुष्यातील अतिशय सुंदर बाजू जगासमोर मांडली. पण तरीही काही गोष्टी अशा असतात ज्यासमोर आपण हतबल होतो. या विवाहित महिलेने व्हिडिओ तयार करून साबरमतीच्या नदीत आत्महत्या केली.
विवाहित महिलेने पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली आहे. पोलिसांनी महिलेने तयार केलेला शेवटचा व्हिडिओ आणि महिलेची नवऱ्यासोबत झालेल्या चर्चेचे ऑडिओ क्लिप ताब्यात घेतले आहेत. महिलेच्या नवऱ्याविरोधात कारवाई सुरू आहे.
अहमदाबादच्या वटवा परिसरात राहणारी आयशा मकरानी हीने २५ फेब्रुवारी रोजी रिवरफ्रंट या साबरमतीच्या नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडिओ केला होता. यामध्ये तिने मी पतीला मुक्त करत आहे, असं म्हटलं आहे.
काय म्हटलंय या व्हिडिओत?
‘हॅलो, अस्सलाम अलेकुम, माझं नाव आयशा आरिफ खान...मी आज ते काही करत आहे, ते माझ्या इच्छेने करत आहे. हे कृत्य कुणाच्याही दबावात करत नाहीये. आता काय बोलू, देवाने दिलेले आयुष्य इतकेच होते आणि हे आयुष्य खूप आरामात जगले. डॅड, किती दिवस लढणार? केस विड्रॉल करुन घ्या.'
'आयशा लढाई करण्यासाठी नाही बनली. आरिफवर प्रेम करते, त्याला त्रास देणार नाही. त्याला स्वातंत्र्य हवं असेल, तर आतापासून तो स्वतंत्र आहे. माझे आयुष्य इथपर्यंतच होते. मी खूप आनंदी आहे, आता मी अल्लाहला भेटणार आणि त्यांना विचारणार की, माझ्याकडून काय चूक झाली होती? आई-वडील चांगले मिळाले, मित्र चांगले मिळाले, पण कुठेतरी माझ्यातच दोष होता. अल्लाहला प्रार्थना करते की, पुन्हा माणसांचे तोंड पाहायला मिळू नये.’
आयशा पुढे म्हणाल्या की, ‘एक गोष्ट शिकत आहे, प्रेम करायचे असेल तर दोन्ही बाजूने असावे. एका बाजूने केलेल्या प्रेमात काहीच मिळत नाही. प्रेम लग्नानंतरही मिळत नाही. प्रिय नदी, मला तुझ्यात सामावून घे आणि माझ्या माघारी जास्त गडबड नको होऊ देऊ... थँक्यू, मला आठवणीत ठेवा. अलविदा..’