अहमदाबाद : दिल्लीच्या बुराडी भागामध्ये एकाच कुटुंबातल्या ११ जणांनी आत्महत्या केली होती. याच घटनेची पुनरावृत्ती अहमदाबादमध्ये झाली आहे. बुधवारी अहमदाबादमधल्या एका कुटुंबाच्या तीन सदस्यांनी तंत्र-मंत्राच्या अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून आत्महत्या केली आहे. कॉस्मेटिकचा व्यापार करणारे कृणाल त्रिवेदी हे मागच्या एका वर्षापासून नरोडामध्ये भाड्यानं राहत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कृणाल त्रिवेदींच्या कुटुंबाचे सदस्या मागच्या २४ तासांपासून फोन उचलत नव्हते. त्यामुळे काही लोकांना संशय आला आणि ते त्रिवेदींच्या घरी गेले. तेव्हा कुणाल फासावर लटकलेले दिसले. तर त्यांची पत्नी जमिनीवर आणि मुलगी बिछान्यावर मृत अवस्थेत होती. हे पाहिल्यानंतर लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कृणालनं पत्ती, मुलगी आणि आईला विष देऊन स्वत: आत्महत्या केली. पोलीस त्रिवेदींच्या घरी पोहोचले तेव्हा कृणालची पत्नी आणि मुलीचा मृत्यू झाला होता. तर कृणालची आई बेशुद्ध अवस्थेत पडलेली होती. कृणालच्या आईला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर तिघांचं पार्थिव पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आलंय. तंत्र-मंत्र आणि काळ्या जादूच्या नादाला लागून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी मात्र याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही.