`भारतात आज मुस्लिमांना जगण्याचा अधिकार नाही मात्र, गायींना तो आहे`
`जेव्हापर्यंत भाजपचं सरकार आहे तेव्हापर्यंत हेच घडत राहणार`
नवी दिल्ली : राजस्थानच्या अलवरमध्ये गो-तस्करीच्या आरोपाखाली रकबर खान याच्या हत्येनंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आलंय. मॉब लिंचिंगच्या घटनांवर 'एआयएमआयएम'चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजप सरकारवर निशाणा लावलाय. ज्या ज्या ठिकाणी भाजपचं सरकार आहे त्या त्या ठिकाणी मॉब लिंचिंगच्या घटना सातत्यानं समोर येत आहेत. याचं कारण म्हणजे, मोदी सरकारचे मंत्री आणि भाजपचे नेते आरोपींच्या बाजुनं उभे राहतात.
जयंत सिन्हा आणि महेश शर्मा यांचा उल्लेख करत सिन्हा यांनी मॉब लिंचिंगच्या आरोपींचं स्वागत केलं तर महेश शर्मा अखलाखच्या मारेकऱ्यांच्या बाजुनं उभे राहिले... जेव्हापर्यंत गाय खाणं बंद करणार नाही तेव्हापर्यंत लोक मॉब लिंचिंगच्या घटना बंद होणार नाही, अशा आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांची वक्तव्य... यातून स्पष्ट दिसतंय की यांच्याच पाठिंब्यामुळे मॉब लिंचिंगच्या घटना सातत्यानं घडत आहेत, असंही ओवैसी यांनी म्हटलंय.
भारतात आज मुस्लिमांना जगण्याचा अधिकार नाही... मात्र, गायींना तो आहे... तुम्ही रकबर याचंच उदाहरण घ्या... पोलिसांनी अगोदर गायीला पोहचवलं... त्यानंतर रकबार खानला हॉस्पीटलला नेण्यात आलं... जेव्हापर्यंत भाजपचं सरकार आहे तेव्हापर्यंत हेच घडत राहणार, असंही ओवैसी यांनी म्हटलंय.
ओवैसी यांनी थेट पंतप्रधानांवर निशाणा साधत 'जर पंतप्रधान मोदींनी ठरवलं तर एकही हिंसेची घटना घडणार नाही. ते खूप काही करू शकतात. त्यांनी एकदा अशा घटना रोखण्याचे आदेश दिले तर मॉब लिंचिंगच्या घटना ९९ टक्के थांबतील' असंही त्यांनी म्हटलंय.