`तीन तलाक विधेयक घटनाविरोधी` - मुस्लिम लॉ बोर्ड
तिहेरी तलाक विधेयक संसदेत सादर होण्याआधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्राच्या विधेयकाला विरोध करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
लखनऊ : तिहेरी तलाक विधेयक संसदेत सादर होण्याआधी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत केंद्राच्या विधेयकाला विरोध करणारा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
कुटुंब उद्ध्वस्त होतील
तीन तलाकविरोधात केंद्र सरकार आणत असलेल्या विधेयकाने अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील. हे विधेयक आणून एकप्रकारचा गुन्हाच केला जात आहे, असा आरोपही बोर्डाकडून करण्यात आला.
वैध प्रक्रिया नाही
या विधेयकाचा मसुदा तयार करताना कोणतीही वैध प्रक्रिया पूर्ण करण्यात आली नाही. या विधेयकाबाबत कुणाचेही मत जाणून घेण्यात आले नाही व कुणाशी चर्चाही केली गेली नाही. त्यामुळेच हे विधेयक मागे घेण्याचे आवाहन आम्ही पंतप्रधानांना करत आहोत, असे बोर्डाचे अध्यक्ष सज्जाद नोमानी यांनी सांगितले.
५१ सदस्य या बैठकीत सामील
मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या कार्यकारिणी समितीचे ५१ सदस्य या बैठकीत सामील झाले होते. या बैठकीनंतर या विधेयकाला विरोध करण्याचं आवाहन ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाकडून सर्वपक्षांना करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. हा कायदा अस्तित्वात आल्यास ट्रिपल तलाक देणा-यावर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच दोषीला तीन वर्षाची शिक्षा आणि दंडही ठोठावला जाऊ शकतो..