Air India Bomb Threat: मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमान बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याचे समोर आले आहे. धमकी मिळताच तातडीने दिल्ली येथे हे विमान वळवण्यात आले आहे. ही घटना रविवार आणि सोमवारच्या दरम्यान घडली असल्याची शक्यता आहे. सध्या हे विमान इंदिरा गांधी आंतरराष्टीय विमानतळावर असल्याचे समजतंय. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात असून प्रवासी आणि विमान कर्मचाऱ्यांचा सुरक्षितता याकडे लक्ष दिले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या माहितीनुसार, सोमवारी 2 वाजण्याच्या सुमारास हे विमान मुंबईहून न्यूयॉर्कसाठी रवाना झाले होते. मात्र, लगेचच दिल्ली विमानतळावर विमानाला डायवर्ट करण्यात आले आहे. सध्या दिल्ली विमानतळावरच हे विमान थांबवून ठेवण्यात आले आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणी सखोल चौकशी करण्यात येत आहे. कोणी मुद्दामून धमकी दिली आहे का? याचा शोध पोलिस घेत आहेत. 


दरम्यान, मागच्या महिन्यात 22 ऑगस्ट रोजीही मुंबईहून निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर तिरुवनंतपुरम विमानतळावर विमान उतरवण्यात आलं होतं. विमानतळातील वॉशरुममध्ये एका टिशू पेपरवर फ्लाइटमध्ये बॉम्ब आहे असा मेसेज लिहिलेला आढळला होता. त्यावेळीही संपूर्ण विमानतळावर इमर्जन्सी घोषित करण्यात आली होती. त्यानंतर एअर इंडियाचे विमान AI 657 ला विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले होते. त्यानंतर फ्लाइट आयसोलेशन करण्यात आले होते. नंतर 135 प्रवाशांना आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी बाहेर काढण्यात आले होते. 



यापूर्वी जून 2024मध्ये चेन्नईहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगो विमानातही बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी मिळाली होती. त्यानंतर मुंबईत इमर्जन्सी लँडिग करण्यात आलं होतं. विमानात 172 प्रवासी आणि कर्मचारी होते.