भारतातलं प्रदूषण ५० टक्क्यांपर्यंत कमी, युरोपियन स्पेस एजन्सीकडून फोटो प्रसिद्ध
देशव्यापी लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झालीच, शिवाय देशातील मोठ्या शहरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी प्रदूषण 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसमुळे coronavirus अनेकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे लॉकडाऊनमुळे Lockdown अनेकांचा जीव वाचवता आला आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत झालीच, शिवाय देशातील मोठ्या शहरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी प्रदूषण 40 ते 50 टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
लॉकडाऊनमध्ये गाड्या, कारखाने, फॅक्टरीमधील अनेक कामं बंद होती. 25 मार्चपासून सुरु झालेल्या देशव्यापी लॉकडाऊनमुळे भारतात प्रदूषणाचा स्तर अतिशय कमी झाल्याचं पाहायला मिळालं आहे. एप्रिल महिन्यात सेंट्रल पॉल्यूशन कंट्रोल बोर्डच्या CPCB रिपोर्टनुसार, 16 मार्च ते 15 एप्रिल दरम्यान राजधानी दिल्लीत गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रदूषणाच्या PM 2.5 मध्ये 46 टक्के आणि PM 10 मध्ये 50 टक्क्यांपर्यंत कमी आल्याचं दिसून आलं आहे.
CPCB रिपोर्टनंतर, आता 'युरोपियन सॅटेलाईट सिस्टम'ने काही फोटो प्रसिद्ध केले आहेत. फोटोमध्ये गेल्या वर्षीच्या आणि यावर्षीच्या जानेवारी ते एप्रिल दरम्यानचा प्रदूषणाचा स्तर दाखवण्यात आला आहे. युरोपियन स्पेस एजेन्सीद्वारा घेण्यात आलेल्या सॅटेलाईट फोटोत 2019 मध्ये 25 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान देशातील विविध भागात पिवळ्या आणि लाल रंगाने नायट्रोजनडाय ऑक्साईडचा स्तर दाखवण्यात आला आहे.
तर दुसऱ्या फोटोत, यावर्षी 2020 मध्ये 25 मार्च ते 20 एप्रिलपर्यंत पिवळ्या-लाल रंगाने दाखवण्यात आलेला प्रदूषणाचा स्तर गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास अर्ध्यावर आलेला दिसतो आहे. विशेषकरुन दिल्ली आणि मुंबईसारख्या महानगरांमध्ये प्रदूषण यावर्षात 40 ते 50 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचं दिसत आहे.