मुंबई : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊन ३१ मे पर्यंत असून देशात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन करण्यात आले आहेत. असे असले तरी नियमांचे पालन करत काही सवलती देखील देण्यात आल्या आहेत. देशांतर्गत विमान सेवा मर्यादीत प्रमाणात आजपासून सुरु करण्यात आली आहे. असे असले तरी काही विमान प्रवाशांना दिलेल्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. संबंधीत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त किंवा उपायुक्त यांची नोडल अधिकाऱ्यांचे यावर लक्ष असणार आहे.


काय आहेत नियम ?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवास सुरु होण्यापूर्वी प्रत्येक प्रवाशाची थर्मल तपासणी होईल याची काळजी विमानतळ प्राधिकरणाने घ्यायची आहे. लक्षणे न दिसणाऱ्या प्रवाशांनाच फक्त प्रवासासाठी विमानात प्रवेश देण्यात येईल. 


सर्व प्रवासी, एअरलाईन कर्मचारी, क्रू आदी सर्वांनी मास्कचा वापर करावा. आगमनानंतर विमानतळावर वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून सर्व प्रवाशांची थर्मल तपासणी करण्यात येईल.  


ज्या प्रवाशांमध्ये लक्षणे दिसतील त्यांना नजिकच्या वैद्यकीय सुविधा केंद्रात नेण्यात येईल आणि केंद्र शासनाच्या यासंदर्भातील मार्गदर्शिकेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.



राज्यात येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या डाव्या हातावर शिक्का मारण्यात येईल आणि या प्रवाशांनी १४ दिवस अनिवार्यपणे गृह विलगीकरणात राहणे बंधनकारक असून या कालावधीत त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची आहे. 


प्रवाशांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत त्यांच्या वैयक्तिक वाहनातून विमानतळावरुन निवासस्थानापर्यंत किंवा निवासस्थानापासून विमानतळापर्यंत प्रवास करता येईल. तथापी, हा प्रवास विमानतळ ते कंटेनमेंट झोन किंवा कंटेनमेंट झोन ते विमानतळ असा करता येणार नाही.


प्रवाशांची नावे, त्यांच्या आगमनाचा दिवस आणि वेळ, मोबाईल क्रमांक, पत्ते इत्यादी सविस्तर माहिती संबंधीत एअरलाईन्स आणि विमानतळ प्राधिकरणाने संबंधीत नोडल अधिकाऱ्यास द्यायची आहे. 


जे प्रवासी राज्यात एका आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी येणार आहेत त्यांचे पुढील प्रवासाचे किंवा परतीचे नियोजन आहे, त्यांनी याची संपूर्ण माहिती दिल्यास त्यांना गृह विलगीकरणातून सवलत देण्यात येईल. या प्रवाशांना कंटेनमेंट झोनमध्ये परवानगी नसेल. 


प्रवाशांनी प्रवासादरम्यान काय करावे आणि काय करु नये यासंदर्भातील माहिती सेवा पुरवठा एजन्सींनी प्रवाशांना तिकीटासोबत देणे बंधनकारक आहे.


सर्व प्रवाशांनी आरोग्यसेतू मोबाईल अॅप डाऊनलोड करणे आवश्यक आहे. प्रवाशांनी या ॲपवरिल संबंधीत घोषणापत्र भरावे.