नवी दिल्ली : भारतीय वायुदलाने पाकिस्तानच्या बालाकोट आणि चकोठीमध्ये घुसून मोठी कारवाई केली. जैश-ए-मोहम्मदच्या अनेक ठिकाणांना भारतीय वायुदलाने नष्ट केले. याआधी देखील भारताने पीओके आणि म्यानमारमध्ये सर्जिकल स्ट्राईक केले होते. त्यावेळी देखील भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची महत्त्वाची भूमिका होती. आज झालेल्या कारवाईमध्ये 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं बोललं जातं आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान मोदींना याची पूर्ण माहिती देण्यात आली. सध्या लष्करप्रमुख बिपीन रावत आणि हवाईदलाचे प्रमुख बीएस धनोआ हे सीमा भागातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. भारतीय एअरफोर्स याआधीच हायअलर्टवर आहे.


कोण आहेत अजित डोवाल?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजित डोवाल हे निवृत्त आयपीएस अधिकारी आहेत. 2014 पासून ते पंतप्रधान मोदी यांचे सुरक्षा सल्लागार आहेत. अजित डोवाल यांनी 1968 मध्ये केरळच्या कॅडरमधून आयपीएस सेवा सुरु केली. अजित डोवाल यांचा जन्म उत्तराखंडच्या पौडी गढवाल येथे झाला आहे. त्यांचे वडील लष्करात होते.


डोवाल 2004 ते 2005 दरम्यान इंटेलिजेंस ब्युरोचे डायरेक्टर होते. त्यांनी पंजाब आणि मिझोरममध्ये झालेल्या ऑपरेशनमध्ये देखील मोठी भूमिका पार पाडली होती. मिझोराममध्ये त्यांनी मिजो नॅशनल फ्रंटची कंबर मोडली होती. त्यानंतर तेथे शांती प्रस्थापित झाली होती. त्यानंतर त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये देखील लष्कराची मोठी मदत केली होती.


1999 मध्ये कंधार विमान हायजॅक झाल्यानंतर प्रवाशांना सुरक्षित आणण्याची जबाबदारी अजित डोवाल यांनाच दिली गेली होती. 29 सप्टेंबर 2016 मध्ये केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची योजना देखील त्यांचीच होती. डोवाल यांचा किर्ती चक्र पुरस्काराने देखील सन्मान करण्यात आला आहे. पाकिस्तानात 7 वर्ष ते गुप्तहेर म्हणून काम करत होते.


अजित डोवाल पोलीस मेडल मिळवणारे सर्वात युवा पोलीस अधिकारी आहेत. अजित डोवाल सिक्योरिटी पॉलिसी ग्रुप (एसपीजी) चे चेअरमन देखील आहेत. 16 सदस्यांचा हा ग्रुप राष्ट्रीय सुरक्षा संबंधित रणनीतीवर काम करतो.