भारतात राहणारा प्रत्येक जण हिंदू - मोहन भागवत
भारतातली सर्व १३० कोटी जनता हिंदू असल्याचा भागवतांचा युक्तीवाद
हैदराबाद : सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नव्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. भारतात राहणारे सर्वच म्हणजे १३० कोटी जनता हिंदूच आहे, असं वक्तव्य मोहन भागवत यांनी हैदरादमध्ये संघाच्या एका कार्यक्रमातील भाषणात बोलताना केलं आहे.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी, भारतातील १३० कोटी लोक हिंदू समाजाचा भाग आहेत. मग त्यांचा धर्म किंवा त्यांची संस्कृती कोणतीही असू दे. भारत पारंपरिकपणे हिंदुत्ववादी असल्याचं भागवत यांनी म्हटलं आहे.
'जेव्हा मी हिंदू समाज असं म्हणतो, त्यावेळी यात असे लोक येतात जे भारताला आपली मातृभूमी मानतात. भारताच्या जल, जंगल आणि जनावरांवर प्रेम करतात. ज्यात राष्ट्रवादाची भावना असते आणि ते भारताच्या संस्कृतीचा सन्मान करतात.' असंही भागवतांनी म्हटलं आहे.
कोणतीही भाषा बोलणारा, कोणत्याही प्रांतातील, कोणत्याही देवाची पूजा करणारा किंवा न करणारा भारताचा पुत्र हिंदु आहे. याआधारे १३० कोटी लोकांचा पूर्ण समाज संघासाठी हिंदू समाज असल्याचं ते म्हणाले. आरएसएसला सर्वांना एकत्र ठेवायचे असून सर्वांचा विकास हवा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
आरएसएस भारतासाठी काम करतं. रवींद्रनाथ टागोर यांचा उल्लेख करत त्यांनी, राजकारण कधीच एकट्याने देशात परिवर्तन आणू शकत नाही, केवळ देशातील लोकच बदल घडवून आणू शकत असल्याचं ते म्हणाले.
मोहन भागवत यांनी सांगितलं की, आपल्याकडे विविधतेत एकता असं प्रसिद्ध वाक्य आहे. परंतु आपला देश एक पाऊल पुढे आहे.आपल्याकडे फक्त विविधतेमध्ये एकता नाही तर एकतेची विविधता आहे.
आम्ही विविधतेत एकता शोधत नाही. आम्ही ऐक्य शोधत आहोत, ज्यामधून विविधता येते आणि ऐक्य मिळवण्याचे भिन्न मार्ग आहेत असं मोहन भागवत म्हणाले.