नवी दिल्ली : एका किरकोळ वादानंतर तरुणांच्या टोळक्याने एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


इलाहाबादमधील एका हॉटेलमधून बाहेर पडताना पीडित तरुणाचा धक्का दुसऱ्या तरुणाला लागला. याचा राग मनात धरत आरोपी तरुणांच्या टोळक्याने पीडित तरुणाला विट-दगड आणि काठ्यांनी मारहाण केली. या मारहाणीत पीडित तरुणाचा मृत्यू झाला आहे. 


रायबरेलीत राहणारा दिलीप हा आपल्या मित्रांसोबत एका हॉटेलमध्ये गेला होता. हॉटेलमधून बाहेर पडताना दिलीपचा एका तरुणाला धक्का लागला. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.



त्यानंतर वाद इतका वाढला की, आरोपी तरुणाने आपल्या मित्रांसोबत मिळून दिलीपला जबर मारहाण केली. त्यांचा राग शांत झाला नाही तर त्यांनी विट-दगडाने ठेचून दिलीपला गंभीर जखमी केलं.


या घटनेवेळी दिलीपसोबत असलेल्या त्याच्या मित्रांनी घटनास्थळावरुन पळ काढला. तर, हॉटेल मालकाने दिलीपला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी हॉटेल मालकालाही मारहाण केली. 


उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दिलीपचा रविवारी मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एका तरुणाला अटक केली आहे.