मुंबई : समाजवादी पक्षाचे माजी नेते आणि राज्यसभा खासदार अमरसिंग यांचं निधन झालं आहे. अमरसिंग यांच्यावर सिंगापूरमध्ये बरेच दिवस उपचार सुरू होते. २०१३ पासून अमरसिंग यांना किडनीची समस्या होती. सिंगापूरमध्ये अमरसिंग यांच्यासोबत त्यांच्या कुटुंबातले सदस्यही होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज सकाळीच अमरसिंग यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विट केलं होतं. तसंच मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छाही दिल्या होत्या. आपल्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरू असून आपण लवकरच बरे होऊ, असा विश्वास व्यक्त करणारा व्हिडिओ अमरसिंग यांनी मार्च महिन्यात ट्विट केला होता. 


समाजवादी पक्षाचे माजी नेते असलेले अमरसिंग आजारी असतानाही सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह होते. २२ मार्चला त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून कोरोना व्हायरसविरुद्धच्या लढ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं समर्थन करण्याचं आवाहन केलं होतं.