अमेठी - लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा पाच वर्षांनंतर उत्तर प्रदेशातील अमेठीत दाखल झाल्या. बुधवारी २७ मार्च रोजी अमेठी दौऱ्यादरम्यान रात्री उशिरा त्या अमेठीतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या घरी दाखल झाल्या. गौरीगंज विधानसभेचे माजी काँग्रेस आमदार नूर मोहम्मद यांचा मुलगा आणि काँग्रेस नेता फतेह मोहम्मद उर्फ फतेह बहादूर यांच्या घरी रात्री उशिरा प्रियंका गांधी पोहचल्या. प्रियंका गांधींनी त्यांना २०१९ च्या निवडणूकीत चांगले काम करण्यास आणि २०२२ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणूकीसाठी तयारी करण्याचे सांगितल्याचे फतेह मोहम्मद यांनी म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेठीत दाखल झालेल्या प्रियंका गांधींनी मुसाफिरखाना येथील एएच इंटर कॉलेजमधील बूथ वर्कर्ससह जवळपास १० तास बैठक घेतली. बैठकीनंतर गौरीगंज येथील काँग्रेस नेत्याच्या घरी पोहचल्या. त्यानंतर रात्री उशिरा जवळपास १२ वाजण्याच्या सुमारास त्या फतेह मोहम्मद यांच्या घरी पोहचल्या. प्रियंका गांधींच्या स्वागतासाठी उभ्या असलेल्या लोकांनी त्यांना तराजूच्या एका बाजूला बसण्यास सांगितले. परंतु त्यात बसण्यास प्रियंका गांधींनी नकार दिला आणि त्यांच्या जागी काँग्रेस नेता फतेह मोहम्मद यांनाच बसवले.  





प्रियंका गांधींनी लोकसभा निवडणूकीत चांगले आणि २०२२ साली विधानसभा निवडणूकीसाठी कठीण मेहनत करून काँग्रेसला विजयी करण्याचे सांगितले. गौरीगंजचे मूळ निवासी फतेह मोहम्मद अल्पसंख्याक समुदायामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु अनेक काळापासून नेतृत्वाबाबत त्यांच्यात नाराजी होती. मात्र आता प्रियंका गांधी यांचे फतेह मोहम्मद यांच्या घरी जाण्याने त्यांच्यातील संबंध सुधारण्यास मदत होणार आहे.