Lockdown : महागाई दर घटला; भाज्यांच्या दरांतही घसरण
कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेलं असतानाच....
नवी दिल्ली : Coronavirus कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेलं असताना आणि सारा देश लॉकडाऊनमध्ये असताना आता महागाई दराच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अतिशय आव्हानाच्या आणि तणावपूर्ण परिस्थितीमध्ये आता एक दिलासादायक वृत्त पाहायला मिळत आहे. मागील म्हणजेच मार्च महिन्याच्या घाऊक महागाई दरात (WPI Inflation) घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
केंद्र सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार देशामध्ये हा दर फेब्रुवारी महिन्यात २.२६ टक्क्यांच्या तुलनेत आता १ टक्क्यावर पोहोचला आहे. वार्षिक आकडेवारीचा आढावा घेतल्यास मागील वर्षी मार्च महिन्यापर्यंत ठोक महागाई दर ३.१८ टक्के इतका होता. त्यामुळे सध्याची ही घट सर्वसामान्यांना दिलासा देणारी ठरु शकते.
बुधवारी केंद्राकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकेवारीनुसार फेब्रुवारी महिन्यात खाण्यापिण्याच्या वस्तूंचा महागाई दर ७.७९ टक्के इतका होता. जो मार्च महिन्यात कमी होऊन ४.९१ टक्क्यांवर पोहोचला. ही बाबही तितकीच महत्त्वाची.
कांद्याचे दर वाढले; पण, अन्य भाज्यांचे दर मात्र कमी झाले.
काही अहवालांनुसार दैनंदिन वापरात असणाऱ्या भाज्यांच्या दरातही घसरण झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात भाज्यांचा महागाई दर हा २९.९७ टक्के इतका होता. जो मार्च महिन्यात कमी होऊन ११.९० टक्क्यांवर पोहोचला. अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार मार्च महिन्यात महागाई दर काही अंशी दिसला तरीही त्याला कांद्याचे वाढलेले दर कारणीभूत होते. कांद्याचा महागाई दर ११२.३१ टक्के इतका राहिला आहे.