Baramulla Encounter: तिथं जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग येथे सध्या दहशतवादी आणि लष्करामध्ये संघर्ष चौथ्या दिवशीही सुरुच असताना बारामुल्ला येछील उरीमध्येही अशीच एक घटना घडली. ज्यामुळं आता जम्मू काश्मीरमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. उरीमध्ये लष्करासोबतच्या संघर्षात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं असून, आता या भागात सैन्य आणि स्थानिक पोलीस प्रशासन शोधमोहिम हाती घेताना दिसत आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या कारवाईची माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काश्मीर साऊथ झोन पोलिसांच्या माहितीनुसार उरीच्या हथलंगा येथे सैन्य आणि पोलीस दलाच्या वतीनं हाती घेतलेल्या मोहिमेत या संघर्षासंदर्भातील माहिती समोर आली. जिथं दहशतवाद्यांना चारही बाजूंनी घेरण्यात आलं असून, एकाचा खात्मा करण्यात संरक्षण दलांना यश आलं. 



अनंतनाग येथे दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्कराचा अखेरचा मारा... 


मागील चार दिवसांपासून अनंतनागमध्ये सुरु असणारा लष्कर आणि दहशतवाद्यांमधील संघर्ष अद्यापही सुरुच आहे. अनंतनाग येथील कोकरनागमध्ये असणाऱ्या घनदाट वनक्षेत्रात दहशतवादी लपून बसल्यामुळं आता त्यांचा मागोवा घेण्यासाठी लष्कर ड्रोनची मदत घेत आहे. इतकंच नव्हे तर, लष्कराकडून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवत रॉकेट लॉन्चरनं हल्लेही चढवले जात आहेत. सध्या इथं लष्कराची विशेष तुकडीही दाखल झाली आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या असणारं तणावाचं वातावण आणि पुन्हा डोकं वर काढणाऱ्या दहशतवादी कारवाया पाहता डीजीपी दिलबाग सिंह यांनी काश्मीर खोऱ्यातील सर्व दहशतवाद्यांचा खात्मा करणार असल्याचा निर्धार बोलून दाखवला. 


हेसुद्धा वाचा : IND vs BAN: अरे यार...; 'या' खेळाडूमुळं टीम इंडियाचा पराभव, आता Final मधून पत्ता कट 


 


इथं लष्कर आणि पोलीस दलाकडून दहशतवाद्यांवर हल्ला चढवला जात असतानाच त्या हल्ल्याचा प्रतिकार करत अनंतनागमधील पर्वतीय भागांमध्ये असणारे दहशतवादी उंचावरून गोळीबार करत आहेत. त्यांच्या या हल्ल्यामध्ये आतापर्यंत सैन्य आणि पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी शहीद झाले आहेत. दरम्यान, अद्यापही दहशतवाद्यांच्या मूळ ठिकाणाची माहिती मिळत नसल्यामुळं लष्कर आता एक अंतिम आणि मोठा आघात करण्याच्या तयारीत दिसत आहे.