अमित शहांची घसरली जीभ! म्हणाले, येडीयुरप्पा सरकार भ्रष्टाचारात क्रमांक एक, द्या पुरस्कार
भर पत्रकार परिषदेत शहांचे हे वाक्य काणी पडताच पत्रकारही काहीसे सावध झाले. मात्र, उपस्थित सहकाऱ्यांनी अमित शहांना घडली चूक लक्षात आणून देताच त्यांनी लगोगल स्वत:ला सावरले
बंगळुरू : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांची जीभ घसरली आणि भाजपसह कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पांचीही मंगळवारी चांगलीच गोची झाली. कर्नाटकातील काँग्रेसप्रणीत सिद्दरमय्या सरकारवर निशाणा साधताना शहा यांनी थेट येडीयुरप्पा सरकारवरच टीका केली. येडीयुरप्पा सरकारला भ्रष्टाचारात क्रमांक एकचा पुरस्कार द्यायला हवा, असे ते म्हणाले. भर पत्रकार परिषदेत शहांचे हे वाक्य काणी पडताच पत्रकारही काहीसे सावध झाले. मात्र, उपस्थित सहकाऱ्यांनी अमित शहांना घडली चूक लक्षात आणून देताच त्यांनी लगोगल स्वत:ला सावरले आणि सिद्दरमय्या यांच्यावरील टीका कायम ठेवली.
येडीयुरप्पांच्या समोरेच शहा म्हणाले येडीयुरप्पा भ्रष्टाचारी
दरम्यान, शहा यांचा हे वक्तव्य करत असतानाचा व्हिडिओ भलताच व्हायरल होत आहे. विरोधकांनीही या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे. तर, ट्विटर, फेसबुक आणि व्हाट्सअॅपवरही नेटीजन्सनी शहांच्या वक्तव्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. कर्नाटकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमित शहा काँग्रेसप्रणीत सिद्दरमय्या सरकारवर टीका करत होते. मात्र, अचानक टीकेच्या भरात त्यांनी थेट येडीयुरप्पांचेच नाव घेतले. ते म्हणाले, 'जर भ्रष्टाचार करण्याची एक स्पर्धा घेतली तर, त्यात येडीयुरप्पा सरकारला प्रथम क्रमांक द्यावा लागेल. विशेष असे की, अमित शहा हे वक्तव्य करत असताना येडीयुरप्पाही अमित शहांच्या बाजुला बसले होते.
काँग्रेसने काढला चिमटा
दरम्यान, शहांच्या वक्तव्याची एक व्हिडिओ क्लिप शेअर करत काँग्रेसने म्हटले की, 'बरोबर आहे. कोणाला माहिती होतं अमित शहाही खरे बोलू शकतात. अमितजी आम्ही तुमच्या विधानाशी सहमत आहोत. येडियुरप्पा भ्रष्टाचारात क्रमांक एकवर आहेत.' काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीनीही येडीयुरप्पा यांच्यावर निशाणा साधला आहे.