जय श्रीराम बोलणारच, हिंमत असेल तर अटक करून दाखवा; अमित शहांचे ममतांना आव्हान
ममतांनी बंगालमध्ये `जय श्रीराम` म्हणायला बंदी केली आहे.
कोलकाता: काहीही झाले तरी मी जाहीरपणे जय श्रीराम बोलणारच. ममता बॅनर्जी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवावी, असे आव्हान भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दिले. ते सोमवारी पश्चिम बंगालच्या जॉय नगर येथील सभेत बोलत होते. पश्चिम बंगाल सरकारने अमित शहा यांच्या जाधवपूर येथील सभेला परवानगी नाकारल्यामुळे सध्या भाजप आणि तृणमूल काँग्रेसमधील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी जॉय नगर येथील सभेत पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांना ललकारले. शहा यांनी म्हटले की, जय श्रीरामचा नारा दिल्याबद्दल ममतांनी मला अटक करून दाखवावी. ममतांनी बंगालमध्ये जय श्रीराम म्हणायला बंदी केली आहे. मात्र, मी आज जाहीर व्यासपीठावर ही घोषणा देणार आहे आणि त्यानंतर कोलकाता येथे जाईन. आता ममता बॅनर्जी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी मला अटक करून दाखवावीच, असे अमित शहा यांनी म्हटले. तसेच बंगाली भाषेचे राज्यात पुनरुज्जीवन करायचे असेल तर भाजपला मत द्या, असेही त्यांनी मतदारांना सांगितले.
यावेळी शहा यांनी विकासाच्या मुद्द्यावरूनही ममता बॅनर्जी यांना लक्ष्य केले. ममता यांच्या काळात पश्चिम बंगालचा जराही विकास झाला नाही. एवढेच नव्हे तर त्यांच्या काळात राज्यात कोणत्याही नव्या कारखान्याची स्थापना झाली नाही. याउलट राज्यात केवळ बॉम्ब तयार करण्याचे कारखाने सुरु झाले, असा टोलाही यावेळी शहा यांनी लगावला.
पश्चिम बंगालमध्ये ममता यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी भाजपने यंदा सर्व ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे ममता आणि भाजप यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतच आहे. पाचव्या आणि सहाव्या टप्प्यात बंगालमधील अनेक महत्त्वपूर्ण जागांसाठी मतदान झाले. या मतदानाला लोकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यामुळे हा वाढलेला टक्का कोणासाठी फायदेशीर ठरणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिले आहे.