वाराणसी: भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यादरम्यान घडलेला एक किस्सा सध्या चांगलाच चर्चेत आहे. आपल्या दौऱ्यादरम्यान 4 जुलै रोजी अमित शहा आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बडा लालपूर येथील व्यापारी केंद्राला भेट दिली. अमित शहा याठिकाणी कारने पोहोचले. मात्र, गाडीतून उतरल्यानंतर समोरचे दृश्य पाहून अमित शहांचा पारा चांगलाच चढला. शहांच्या गाडीसमोरच प्लॅस्टिकच्या बाटल्या आणि खोके अस्ताव्यस्त पडले होते. हे पाहून संतापलेल्या अमित शहांनी लगेच कार्यकर्त्यांना फैलावर घेतले. त्यांनी कार्यकर्त्यांना हा कचरा हटवण्यास सांगितले. मात्र, शहांची पाठ वळताच कार्यकर्त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले आणि हा कचरा तेथे पडून राहिला. काहीजणांनी कचरा फक्त बाजूला सारुन ठेवला. मात्र, मैदानातून कचरा कोण बाहेर फेकणार, यावरुनच कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. अखेर एनएसजीच्या एका कमांडोने पायाने हा कचरा दूर सारला. हा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकजण भाजपावर टीका होत आहे.