Amit Shah Reprimanded Soundararajan : लोकसभा निवडणुकांचे (Loksabha Election 2024) निकाल जाहीर झाल्यानंतर देशात सत्तास्थापनेचे वारे वाहू लागले आणि पाहता पाहता केंद्रात भाजपप्रणित एनडीएची सत्ता स्थापन झाली. तिथं केंद्र सरकारमध्ये भाजपचं वर्चस्व असतानाच इथं एनडीएतील घटक पक्षांना वर्चस्व मिळालेल्या राज्यांमध्येही राजकीय समीकरणं बदलून या राज्यांना राजकीय पटलावर अनन्यसाधारण महत्त्वं प्राप्त झालं. त्यापैकीच एक म्हणजे आंध्र प्रदेश. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सत्तास्थापनेसाठी भाजपला साथ देणाऱ्या चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह भाजपमधील वरिष्ठ नेतेमंडळींचीसुद्धा हजेरी पाहायला मिळाली होती. याच कार्यक्रमादरम्यान दक्षिणेच्या राजकारणातील काही मोठी नावं आणि चेहरेसुद्धा या शपथविधी सोहळ्याला हजर असल्याचं दिसून आलं. फक्त नेते मंडळीच नव्हे, तर हजारोंच्या संख्येनं असणाऱ्या जनसमुदायानं या कार्यक्रमाची शोभा वाढवली होती. पण, या संपूर्ण कार्यक्रमानंतर एक विषय कमालीचा चर्चेत आला आणि व्हायरलही झाला. 


सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमुळं चर्चांना उधाण 


व्हायरल व्हिडीओमुळं सुरु असणाऱ्या चर्चांनुसार अमित शाह यांनी या कार्यक्रमात व्यासपीठावरच, हजारोंच्या जनसमुदायासमोर तामिळनाडूच्या माजी राज्यपालांना रागे भरलं. व्हायरल व्हिडीओ पाहता, अमित शाह व्यासपीठावर असतानाच एक महिला अधिकारी, तामिळनाडूच्या माजी राज्यपाल तमिनिसाई यांनी व्यंकैय्या नायडू यांना अभिवादन केलं आणि त्या पुढे गेल्या. तितक्यातच अमित शाह यांनी त्यांना आवाज देत मागे बोलवून घेतलं. 


क्षणातच अमित शाह यांचे हावभाव बदलले आणि त्यांच्या चेहऱ्यावर काहीशी गंभीर मुद्रा पाहायला मिळाली. शाह कोणा एका गोष्टीसाठी तमिलिसाई यांना नकार देत असल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहता ते चिडले असल्याचं प्राथमिक अंदाज व्हिडीओ पाहणाऱ्यांनी लावला. या साऱ्यामध्ये या माजी राज्यपाल शाह यांना जे काही समजावत होत्या ते त्यांनी ऐकून न घेता नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. आता शाह त्यांना नेमकं काय म्हणाले, हाच प्रश्न सर्व स्तरांतून उपस्थित केला जात आहे. 


हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather News : मान्सूनचा वेग मंदावला; मुंबईसह उपनगरात आकाश ढगाळ, विदर्भाला अद्यापही पावसाची प्रतीक्षा 


तणावास कारण काय?  


सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय असून, काहींच्या मते अन्नामलाई यांच्यासोबतच्या तणावावरूनच तमिनिसाई सुंदरराजन यांची शाह यांच्याकडून कानभघडणी झाली असावी. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला या राज्यात एकही जागा मिळू शकलेली नाही, ज्यानंतर राज्यातील भाजपचे प्रमुख, अन्नामलाई यांच्यावरच पराभवाचं खापर फोडलं जात आहे. आता या राजकीय तणावावर नेमका तोडगा काय निघणार हेच पाहणं महत्त्वाचं असेल. 



दरम्यान, भाजपची दोन मोठी नावं असणाऱ्या अन्नामलाई आणि तमिलिसाी सौंदर्यराजन यांच्यामध्ये कमालीचे मतभेद असल्याचं आता उघड झालं आहे. स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरून हे मतभेद झाल्याचं सांगितलं जात आहे. तमिलिसाई यांनी पक्षानं तर एआयडीएमकेसोबत युती केली असती, तर प्रचंड मताधिक्यानं विजयी होता आलं असतं असं स्पष्ट मत मांडलं होतं. पण, अन्नामलाई यांनी मात्र याविषयी कोणतंही मत मांडलं नव्हतं, पण त्यांच्या समर्थकांकडून मात्र तमिलिसाई यांचा कडाडून विरोध करण्यात आला होता. 


लोकसभेचे निकाल हाती आले आणि निकालानुसार तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमुकसह भाजपलाही एकसुद्धा जागा मिळाली नाही. उलटपक्षी एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्त्वातील द्रमुकनं राज्यात 39 पैकी 22 जागांवर विजय मिळवत, 9 जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्या. अनेक भाजप नेते या निवडणुकीत तोंडघशी पडले, यामध्ये खुद्द अन्नामलाई आणि सौंदर्यराजन यांचाही समावेश होता.