अमित शहांमुळे भारत विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात खेळणार; ओमर अब्दुल्लांचा टोला
आता अमित शहा याला कशाप्रकारे उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी दिल्ली: सध्या राष्ट्रीय राजकारणात कर्नाटक आणि गोव्यातील आमदारांच्या फोडाफोडीचा चांगलीच चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी शुक्रवारी ट्विटवरवरून भाजप नेते अमित शहा यांना उद्देशून एक मजेशीर टिप्पणी केली. ही टिप्पणी करताना ओमर अब्दुल्ला यांनी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या झालेल्या पराभवाचा संदर्भ जोडला आहे.
भारतीय संघाला बुधवारी विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या सामन्यात न्युझीलंडकडून १८ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे. साहजिकच यामुळे लाखो भारतीय क्रिकेट चाहते निराश झाले होते.
ओमर अब्दुल्ला यांनी म्हटले आहे की, मला सध्या व्हॉटसअॅपवर फिरत असलेल्या संदेशांपैकी एक संदेश खूपच आवडला. यामध्ये म्हटले आहे की, न्यूझीलंडच्या नऊ खेळाडूंचा राजीनामा, टीम इंडियात प्रवेश. अमित शहा म्हणाले, भारत अंतिम सामन्यात खेळणार, अशा आशयाचा हा संदेश आहे. ओमर अब्दुल्लांचे हे ट्विट चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यामुळे आता अमित शहा याला कशाप्रकारे उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कर्नाटकमध्ये गेल्या काही दिवसांपासून एकामागोमाग रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. सत्ताधारी काँग्रेस आणि सेक्युलर जनता दलाच्या (जेडीएस) आमदारांनी राजीनामे दिल्याने सरकार अडचणीत आले आहे. या सगळ्यापाठी भाजप असल्याचा आरोप मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी केला होता. तर दुसरीकडे गोव्यातही भाजपने काँग्रेसचे १० आमदार फोडले होते. त्यामुळे गोवा विधानसभेतील काँग्रेसचे संख्याबळ अवघ्या पाच आमदारांवर आले आहे.