तरुणांनो, टिळकांचं साहित्य वाचा, आयुष्यातील अनेक कोडी सुटतील- अमित शाह
आज १०० वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांचे विचार तितकेच कालसुसंगत आहेत
नवी दिल्ली: देशातील तरुणांनी लोकमान्य टिळकांचे आत्मचरित्र वाचले तरी त्यांच्या आयुष्यातील अनेक समस्या सुटतील. त्यांचे विचार आजही कालसुसंगत आहेत, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. ते शनिवारी लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन परिसंवादात बोलत होते. यावेळी अमित शाह यांनी म्हटले की, लोकमान्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्व देशवासियांच्यावतीने मी त्यांना नमन करतो. तरुणांना भारत आणि इतिहासाबद्दल जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी टिळकांचे साहित्य वाचले पाहिजे. आज १०० वर्ष उलटून गेल्यानंतरही त्यांचे विचार तितकेच कालसुसंगत आहेत. यावरुन लोकमान्य टिळक किती द्रष्टे नेते होते, याची कल्पना येऊ शकते, असे अमित शाह यांनी म्हटले.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवणारच, ही लोकमान्यांची घोषणा स्वातंत्र्य चळवळीतील सुवर्णशब्द आहेत. ते केवळ घोषणा देऊनच थांबले नाहीत तर ते आयुष्यभर त्यासाठी झटले. हे फारच थोडक्या लोकांना साध्य होते, असे कौतुकोद्गार अमित शाह यांनी काढले.
दरम्यान, लोकमान्य टिळकांच्या १००व्या पुण्यतिथीनिमित्त आज काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि वर्षा गायकवाड यांनी गिरगाव चौपाटीवरील स्मारकावर जात त्यांना अभिवादन केले. यावेळी बाळासाहेब थोरात यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, लोकमान्यांनी स्वराज्य, लोकशाहीची कल्पना मांडली. ते टिकवण्याचं काम आजही करावं लागतं आहे. ही सध्याच्या काळात चिंतेची बाब असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.