अमिताभ घोष यांना यंदाचा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
त्यांची `द सर्कल ऑफ रीजन` कादंबरी बरीच गाजली होती.
नवी दिल्ली: साहित्य क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठेचे स्थान असणारा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा प्रख्यात इंग्रजी साहित्यिक अमिताभ घोष यांना जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार निवड समितीच्या शुक्रवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. ११ लाख रूपये, प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असते.
'शॅडो लाईन्स' या पुस्तकासाठी अमिताभ घोष यांना यापूर्वी साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. तसेच केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.
११ जुलै १९५६ रोजी कोलकाता येथे अमिताभ घोष यांचा जन्म झाला. दिल्लीच्या सेंट स्टीफन आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थांमधून घोष यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी काही काळ पत्रकारिताही केली. 'द सर्कल ऑफ रीजन' ही त्यांची पहिली कांदबरी होती. या कादंबरीने अमिताभ घोष यांना अमाप प्रसिद्धी मिळवून दिली.