अलीगड : अलीगड मुस्लिम विद्यापीठाच्या ७ मार्चला होणाऱ्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रपती ७ मार्चला विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. पण एएमयू स्टुडंट्स युनियननं राष्ट्रपतींच्या २०१० साली दिलेल्या वक्तव्यावर माफीची मागणी केली आहे. राष्ट्रपतींना माफी मागायची नसेल तर त्यांनी दीक्षांत सोहळ्याला येऊ नये, असा इशारा युनियननं दिला आहे.


२०१० साली केलेल्या वक्तव्यावरून वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इस्लाम आणि ख्रिश्चन देशाबाहेरचे आहेत, असं वक्तव्य रामनाथ कोविंद यांनी २०१० साली केलं होतं. रंगनाथ मिश्रा कमीशनच्या रिपोर्टवर बोलताना कोविंद यांनी ही टिप्पणी केली होती. रंगनाथ कमीशननं सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्यांकांना १५ टक्के (१० टक्के मुस्लिमांना आणि ५ टक्के अन्य अल्पसंख्यांकांना) आरक्षण द्यायची शिफारस केली होती.


काय म्हणाले होते कोविंद?


मुस्लिम आणि ख्रिश्चनांना अनुसुचित जातींमध्ये समाविष्ट करणं गैर-संविधानिक ठरेल, असं तेव्हा कोविंद म्हणाले होते. कोविंद त्यावेळी भाजपचे प्रवक्ते होते. शिख धर्माला या वर्गामध्ये कसं आरक्षण मिळतं, असा सवाल कोविंद यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी इस्लाम आणि ख्रिश्चन देशासाठी बाहेरील आहेत, असं कोविंद म्हणाले होते.


राष्ट्रपती कोविंद यांच्या दौऱ्याचा विरोध


२०१० साली केलेल्या वक्तव्यावरुन कोविंद यांनी माफी मागावी. माफी मागूनच राष्ट्रपतींनी दीक्षांत सोहळ्यात भाग घ्यावा, अशी मागणी एएमयूनं केली आहे. दीक्षांत सोहळ्यामध्ये काही झालं तर याची जबाबदारी राष्ट्रपती आणि कुलगुरूंची असेल, कारण विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे, असा इशारा युनियननं दिला आहे.