मुंबई : नव्या वर्षी बक्कळ कमाई करायचा विचार असेल तर अमूल तुमच्यासाठी नवी संधी घेऊन आलं आहे. नवीन वर्षामध्ये अमूल फ्रॅन्चायजी ऑफर करत आहे. अमूल कोणतीही रॉयल्टी आणि प्रॉफिट शेयरिंगशिवाय ही फ्रॅन्चायजी देणार आहे. एवढच नाही तर अमूलची फ्रॅन्चायजी घ्यायचा खर्चही जास्त नाही. २ लाख रुपये ते ६ लाख रुपये गुंतवून तुम्ही व्यवहार सुरु करु शकता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमूलने दोन प्रकारच्या फ्रॅन्चायजी ऑफर केल्या आहेत. जर तुम्हाला अमूल आऊटलेट, अमूल रेल्वे पार्लर किंवा अमूल क्योस्क फ्रॅन्चायजी घ्यायची असेल तर २ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. यामध्ये नॉन रिफंडेबल ब्रॅण्ड सिक्युरिटीचे २५ हजार रुपये, दुकानाच्या नुतनीकरणाचे १ लाख रुपये, अमूलच्या उपकरणांचे ७५ हजार रुपये यांचा समावेश आहे.


अमूलचं आईस्क्रीम पार्लर सुरु करण्यासाठी तुम्हाला जवळपास ५ लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. यामध्ये ब्रॅण्ड सिक्युरिटीचे ५० हजार रुपये, दुकानाच्या नुतनीकरणासाठी ४ लाख रुपये, अमूलच्या उपकरणांसाठी १.५० लाख रुपये मोजावे लागतील.


अमूलने दिलेल्या माहितीनुसार एका फ्रॅन्चायजीमधून महिन्याला ५ लाख ते १० लाख रुपयांची विक्री होऊ शकते. पण हे फ्रॅन्चायजीच्या ठिकाणावर अवलंबून आहे. अमूल फ्रॅन्चायजी घेतल्यानंतर कंपनी मिनिमम सेलिंग प्राईज म्हणजेच एमआरपीवर कमीशन देते.


अमूलकडून दुधाच्या पिशवीवर २.५ टक्के, दुग्धजन्य पदार्थांवर १० टक्के, आईसक्रीमवर २० टक्के कमीशन मिळतं. अमूल आईसक्रीम पार्लरची फ्रॅन्चायजी घेतल्यावर रेसिपी बेस्ड आईसक्रीम, शेक, पिझ्झा, सॅण्डविच, हॉट चॉकलेट ड्रिंक यावर ५० टक्के कमीशन मिळतं. तर आधीच पॅक केलेल्या आईसक्रीमवर २० टक्के आणि अमूलच्या उत्पादनांवर १० टक्के कमीशन मिळेल.


अमूलची फ्रॅन्चायजी घ्यायची असेल तर तुमच्याकडे १५० स्क्वेअर फूट जागा असणं बंधनकारक आहे. तर अमूल आईसक्रीम पार्लरची फ्रॅन्चायजी घेण्यासाठी कमीत कमी ३०० स्क्वेअर फूट जागा लागणार आहे. यापेक्षा कमी जागा असेल तर अमूल फ्रॅन्चायजी देणार नाही.


फ्रॅन्चायजी घेतल्यानंतर अमूलकडून तुम्हाला एलईडी सायनेज देण्यात येईल. सगळ्या उत्पादनांवर आणि ब्रॅण्डिंगवर सबसिडीही देण्यात येणार आहे. तसंच जास्तीचा माल खरेदी केला तर डिस्काऊंटही देण्यात येणार आहे. आईसक्रीम पार्लरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला आणि मालकाला ट्रेनिंगही देण्यात येणार आहे. तसंच अमूलची उत्पादनं फ्रॅन्चायजीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी अमूलकडे असणार आहे अमूलने प्रत्येक जिल्ह्यात आणि मोठ्या शहरात होलसेल डिलर्सची नियुक्ती केली आहे. हे होलसेल डिलर्स पार्लरपर्यंत अमूलची उत्पादनं पोहोचवणार आहेत.


अमूलची फ्रॅन्चायजी घेण्यासाठी तुम्हाला retail@amul.coop वर मेल करावा लागेल. संपूर्ण प्रक्रिया जाणण्यासाठी अमूलच्या http://amul.com/m/amul-scooping-parlours या लिंकवर जाऊन माहिती घ्या.