आता प्या उंटिणीचे दूध, मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी
![आता प्या उंटिणीचे दूध, मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी आता प्या उंटिणीचे दूध, मधुमेही रुग्णांसाठी आरोग्यदायी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/styles/zm_500x286/public/2019/01/23/318607-camel-milk.png?itok=gX3iZTRj)
विविध आजारांवर उंटिणीचे दूध गुणकारी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याची मागणी वाढत होती
अहमदाबाद - दी गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड अर्थात अमूलने ठरावीक बाजारामध्ये उंटिणीचे दूध विक्रीसाठी आणले आहे. सध्या हे दूध अहमदाबाद, गांधीनगर आणि कच्छच्या बाजारात उपलब्ध करून देण्यात आले आहे. या दुधाच्या अर्धा लिटर बाटलीची किंमत ५० रुपये इतकी आहे. विविध आजारांवर उंटिणीचे दूध गुणकारी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याची मागणी वाढत होती. त्यामुळे हे दूध विक्रीसाठी आणण्यात आल्याचे अमूलने म्हटले आहे.
अमूलने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनानुसार, उंटिणीचे दूध शरीरासाठी गुणकारी आणि आरोग्यदायी असते. ते पचण्यासाठी अत्यंत हलके असते. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे दूध विशेष उपयोगी आहे. उंटीणीचे दूध मधुमेह, स्वमग्नता, संधिवात यावर गुणकारी असते. यामध्ये प्रथिने मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्याचा मधुमेहाच्या रुग्णांना त्याचा फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर ज्या लोकांना दूध किंवा दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे. त्यांच्यासाठीही हे दूध उपयोगी आहे. कारण या दुधामध्ये ऍलर्जीचे कोणतेही घटक नाहीत. सध्या केवळ अर्ध्या लिटरच्या बाटलीमध्ये हे दूध उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सर्वसामान्य दूधाप्रमाणे उंटिणीचे दूधही फ्रिजमध्ये ठेवावे लागते. त्याचबरोबर बाजारात विक्रीसाठी आणल्यानंतर तीन दिवसांच्या आत त्याचे सेवन करणे आवश्यक आहे, असे कंपनीने म्हटले आहे. अमूलने याआधीच कॅमल मिल्क चॉकलेट बाजारात उपलब्ध करून दिले आहे.